साळवण : टेकवाडी-वेतवडे दरम्यान कुंभी नदीवरील सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा पिलर कोसळल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने करणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी तिसंगी, वेतवडे येथील पिके धोक्यात आली असून, पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती ताबडतोब करावी, अशी मागणी होत आहे.वेतवडे बंधारा हा एकूण अकरा गाळ््यांचा आहे. सहा नंबरच्या गाळ््यामध्ये कित्येक दिवसांपासून एका मोठ्या झाडाचा बुंधा अडकून पडला आहे. संबंधित विभागाने हा बुंधा बाजूला काढणे आवश्यक होते; पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. शेजारचा सात नंबरच्या गाळ््याच्या पिलरचा नदीच्या तळाकडील बाजूचा भाग कोसळला आहे. नदीपात्रात दगड विखरून पडले आहे.अनेक गाळ््यांतून पाणी साठविणाऱ्या प्लेटस् अडकविण्याच्या खाचा खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्या गाळ््यातून प्लेटस् बसविणे अवघड बनले आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही कडेला वरील बाजूस छोटे संरक्षक पिलर्स होते, पण त्यापैकी अनेक पिलर्स निकामी झाले आहेत. पुराच्यावेळी प्रवाशांना बंधाऱ्यावरून जाण्यासाठी हे छोटे पिलर्स दिशा दर्शकाची भूमिका बजावत होते.टेकडीवरील बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला यापूर्वी मोठी भेग पडली होती. संबंधित विभागाने या ठिकाणी काही प्रमाणात डागडुजी केली होती, मात्र मजबुतीकरण झाले नाही, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे टेकवाडीकडील बाजूची झीज मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या बाजूला नदीलगत टेकडीवर मानवी वस्ती असल्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे. बंधाऱ्याच्या पृष्ठभागावरसुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. (वार्ताहर)शेतातील पिके होरपळून जाण्याची भीतीबंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे पाणीसाठ्याअभावी शेकडो एकरांतील ऊस, भात, मका, सूर्यफूल पिके उन्हामुळे होरपळून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. उन्हाळी भात रोप लावणी केलेल्या वाफ्यात पाणीसाठा करणे कठीण बनले आहे. पिके कशी वाचवायची ही शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच वेतवडे, तिसंगी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वेतवडे बंधाऱ्याचा पिलर कोसळल्यामुळे कुंभी नदीपलीकडील वेतवडे, बालेवाडी, मणदूर या गावांच्या वाहतुकीबरोबरच शेती, पिण्याचे पाणी यांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. अणदूर बंधारा पिलर कोसळल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. मणदूर पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे, तर आता वेतवडे बंधारा पिलर कोसळल्यामुळे धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने या बंधाऱ्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी आणि वाहतूक, शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. - मेघाराणी जाधव, जि. प. सदस्याउन्हाळ््यात वातावरण स्वच्छ असते, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात वाढ होते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पीक केले आहे. बंधाऱ्यात पाणीसाठाच नसल्यामुळे कोवळी भात रोपे कोमेजू लागली आहेत. सूर्यफूल आणि ऊस पीक पाण्याअभावी वाळू लागली आहेत. संबंधित विभागाने बंधाऱ्याची डागडुगी त्वरित करावी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे.- रघुनाथ दगडू शिंदे,शेतकरी वेतवडे
टेकवाडी-वेतवडे बंधाऱ्याचा पिलर कोसळला
By admin | Updated: February 9, 2015 00:38 IST