कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेमध्ये संचालकांनी केलेल्या उधळपट्टीबाबत निबंधकांनी दिलेल्या अहवालानुसार संचालक मंडळावर कारवाई करा, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. चुकीचा कारभार करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचा पुनरुच्चार करीत शिक्षक बॅँकेबाबत ‘सु-मोटो’ योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिक्षक बॅँकेच्या कारभाराबाबत शहर उपनिबंधक रंजन लाखे व करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांकडे अहवाल सादर केला. संचालकांच्या कारभारावर ताशेरे ओढले. अहवालावर जिल्हा उपनिबंधक नेमकी कोणती कारवाई करणार, याविषयी सभासदांमधून विचारणा होत आहे. बॅँकेतील विरोधकांनीही उधळपट्टीचा मुद्दा उचलून धरला. याबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आम्ही सहकारात शुद्धिकरण मोहीम राबविलीे. जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई केली आहे. भ्रष्टाचारामुळे या जीवनदायीनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे खपवून घेणार नाही, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. शिक्षक बॅँकेतील गैरकारभाराबाबत निबंधकांनी दिलेल्या अहवालानुसार कारवाईचे आदेश उपनिबंधकांना दिले आहेत. चुकीचा कारभाराने संस्था संपविणाऱ्यांचे लाड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अहवालानुसार कारवाई करा
By admin | Updated: February 9, 2015 00:39 IST