आजरा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मराठा उमदेवारांचे पूर्वलक्षी प्रभावाने सर्व लाभ काढून घ्या, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात करून काही मंडळी मराठा आरक्षणामध्ये नाहक लुडबुड करीत आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आजरा तालुका सर्कल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. निवेदनाची प्रत आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले.
एसईबीसीअंतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी काही जणांकडून केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला ९ सप्टेंबर २०१९ रोजी स्थगिती दिली. त्यामुळे २०१८ पासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत सरकार सहकार्य करणार होते. मात्र, तत्पूर्वीच लोकसेवा आयोगाने याचिका दाखल करून झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली आहे. याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायालयात दाखल केलेला अर्ज व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सहावेळा संधीचा फायदा मिळेल, अशी एकतर्फी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्य शासनाने हस्तक्षेप करून मराठा समाजाचा उद्रेक थांबवावा, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर, जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------
* फोटो ओळी : मराठा महासंघाच्या वतीने मागणीचे निवेदन तहसीलदार विकास अहिर यांना देताना मराठा समाजाचे कार्यकर्ते.
क्रमांक : २२०१२०२१-गड-०५