चंदगड : शिनोळी (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका शिवसेनेतर्फे कर्नाटक पोलिसांच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढून येळ्ळूर येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.येळ्ळूर (ता. व जि. बेळगाव) येथील मराठी बांधवांवर कर्नाटक पोलिसांनी दंडुका चालवून अमानुषपणे अत्याचार केला. या निषेधार्थ शिवसेनेतर्फे कर्नाटक शासनाचा प्रतीकात्मक तिरडी मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे युवा नेते प्रभाकर खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. संजय पाटील, महादेव गावडे, शांता जाधव, अंकुश भोसले, बाळासाहेब पाटील, निंगाप्पा पाटील, परशराम शिवणगेकर, विजय कोकितकर, वैभव करटे, भरमा पाटील, नारायण पाटील, तानाजी पाटील, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी युवा नेते प्रभाकर खांडेकर यांनी कर्नाटक शासनाने सीमाभागातील मराठी बांधवांवरील अत्याचार थांबवावेत; अन्यथा सीमेजवळील मराठी बांधव आपल्या बांधवांचे रक्षण करतील, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)
'येळ्ळूर’च्या निषेधार्थ तिरडी मोर्चा
By admin | Updated: August 1, 2014 23:59 IST