इचलकरंजी : प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कबनूरमधील लक्ष्मी माळ येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये वैभव अनिल पुजारी (वय २३, बिरोबा मंदिर शेजारी, चंदूर ता. हातकणंगले) हा गंभीर जखमी झाला. याबाबत पाचजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मयूर आकाराम पुजारी (रा. चंदूर), ओंकार बिरू पुजारी (रा. तिळवणी), शुभम बोरसे (रा. उदगाव), राहुल श्रीकांत कांबळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी), बंडा शिंदे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वैभव याने महिन्याभरापूर्वी गायत्री विठ्ठल माने हिच्याशी प्रेमविवाह केला आहे. त्या रागातून चौघांनी मोटारसायकलवरून वैभव याचा पाठलाग केला. आभार फाट्यावरील लक्ष्मी माळ येथे वैभव हा पोहोचला असता. मयूर हा ‘वैभ्या तुझी आता काही खैर नाही तुला आज आम्ही जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली, तर चौघांनी वैभव याला ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारी घेऊन पाठलाग केला असता वैभव हा जीव वाचविण्यासाठी एका घरात शिरला. ओंकार, शुभम आणि राहुल यांनी तलवारीने वैभव याच्या हातावर, पाठीत, डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. ही माहिती समजताच पोलिसांनी व मित्रांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रितल परुले तपास करीत आहेत.जखमी वैभववर गुन्हेवैभव याच्यावर यापूर्वी जनावरे चोरीचे शहापूर, शिवाजीनगर, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, इस्पुर्ली, आदी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
Kolhapur Crime: प्रेमविवाह केल्याचा राग; कबनूरमध्ये पाठलाग करत तलवार हल्ला, तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:51 IST