कोवाड : सन २०१३-१४ या गळीत हंगामातील हेमरस कारखान्याकडे पाठविलेल्या उसाचा दुसरा हप्ता त्वरित मिळावा यासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हेमरस कारखान्यावर भव्य मोर्चा काढला. मात्र, हेमरस प्रशासनाकडून या मोर्चाची दखलच घेतली नाही. कारखाना प्रशासनाने १० आॅगस्टपर्यंत मागणी मान्य करावी अन्यथा ११ आॅगस्टपासून कारखान्यासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिला.‘हेमरस’ने शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन २२७० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता अदा केला आहे. दुसरा हप्ता त्वरित मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, जिल्हा उपाध्यक्ष एस. एम. कोले, चंदगड तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मात्र, कारखान्याच्या मुख्य गेटसमोरच पोलिसांनी हा मोर्चा रोखून धरला. संतप्त मोर्चेकऱ्यांना कारखाना प्रशासनाकडून कोणतीच दाद मिळाली नाही. मोर्चेकरी कारखान्याबाहेर, मध्ये पोलीस, तर कारखान्यात प्रशासन अशी अवस्था निर्माण झाली.कारखाना प्रशासनाकडून निर्णय घेणारा एकही अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला. कारखान्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त बनले. एस. एम. कोले, नितीन पाटील, राजेंद्र गड्यान्नावर यांनी कारखान्याबाबत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. (वार्ताहर)
‘हेमरस’वर स्वाभिमानीचा मोर्चा
By admin | Updated: August 5, 2014 23:39 IST