कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून घर सर्वेक्षण सुरू असून या अंतर्गत ४४६ नागरिकांचे त्यांच्या घरात जाऊन स्वॅब घेण्यात आले.
शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भागात दैनंदिन घर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. गुरुवारी शहरातील ११७१ घरात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी ४५०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ४४६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.
गुरुवारी लक्षतीर्थ वसाहत, दुधाळी, मस्कुती तलाव, शिपुगडे तालीम, ब्रम्हपुरी, राजारामपूरी, शाहूपूरी, सम्राटनगर, प्रतिभानगर, यादवनगर, शाहूनगर, दौलतनगर, इंदिरानगर, सदरबाजार, रविवार पेठ, संभाजी नगर, महाकाली मंदिर परिसर, जरगनगर, राजेंद्रनगर, सुभाषनगर, रामानंदनगर, एसएससी बोर्ड या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.