कोल्हापूर : साखर कारखान्याने गळीत हंगामात स्वच्छ ऊस पुरवठ्याकडे लक्ष द्यावे. ऊस तोडणी वाहतुकीच्या दरात सर्वच कारखान्यात समानता ठेवा, तोडणी वाहतूक खर्चात बचत करून शेतकऱ्यांना जास्तीचा दर कसा मिळेल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांना दिल्या. चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही, यादृष्टीने काळजी घ्यावी. दरम्यान, शेती अधिकाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्चित विचार करेल, त्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
पुणे येथील साखर आयुक्तालयात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची विविध प्रश्नांवर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला उत्तम इंदलकर, सहसंचालक विकास शेळके, सहसंचालक उपपदार्थ डॉ. संजय भोसले, दालमियाचे शेती अधिकारी संग्राम पाटील, शाहू कारखान्याचे रमेश गंगाई, जवाहर कारखान्याचे किरण कांबळे, हमिदवाडा कारखान्याचे गोकुळ मगदूम, डी. एन. पाटील आदींसह शेती अधिकारी व साखर आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊस तोडणी वाहतूक प्रश्नावर मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली.
ऊस तोडणी वाहतुकीच्या सर्वच कारखान्यांच्या दरात समानता राहील. कारखान्याने यंत्राद्वारे, अंगद गाडी (कार्टिंग), बाईडिंग मटेरियल, तोडणी, वाहतूक आणि मुकादम खर्चावर चर्चा करताना तोडणी वाहतूक खर्चात बचत कशी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना जादाचा दर कसा मिळेल, याची माहिती कारखाना प्रशासनाला वेळोवेळी द्यावी, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
चौकट ०१
पुढील हंगामाचे आताच नियोजन करा
यंदाच्या हंगामात ऊस शिल्लक राहू नये म्हणून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देतानाच पुढील हंगामात ऊस जास्त असल्याने आतापासूनच स्वतंत्र नियोजन तयार करा, असे आदेशच मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेती अधिकाऱ्यांना दिले. शेती विभागाने अधिक दक्ष राहून सूक्ष्म आराखडे तयार करावेत, असेही त्यांनी सुचविले.