शिवसेना-भाजपाची सत्ता राज्यात स्थापन करण्यात कोल्हापूर जिल्ह्याने मोलाची साथ दिली आहे. त्यामध्ये पक्षाचे आमदार सुरेश साळोखे हे होतेच, पण त्याबरोबर नामदेवराव भोईटे (राधानगरी), संजय गायकवाड (शाहूवाडी), भरमू सबराव पाटील (चंदगड) या अपक्ष आमदारांचे योगदान महत्त्वाचे आहे. विधानसभेवर भगवा फडकविण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुरे झाले, पडत्या काळातही कोल्हापूरने साथ दिल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेहमी कोल्हापूर आवडते बनले. आई अंबाबाईला नतमस्तक होऊनच शिवसेनेच्या प्रचाराचा कायम बिगुल वाजला आहे. तसा कोल्हापूर हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला बनला. कोल्हापुरात शिवसेनेची शाखा स्थापन करण्याचे श्रेय सुरेश साळोखे व कौतुक राणे यांना जाते. त्यांनी थेट मुंबईत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. तुमच्यासाठी कोल्हापुरात शिवसेना स्थापन करायची आहे, तुम्ही येणार असाल तर शिवसेना काढू असे सुरेश साळोखे म्हणाले. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘तुमच्यासाठी नाही आपल्यासाठी म्हणा’ असे म्हणत हसतच ठाकरे खुर्चीतून उठले त्यांनी दोघांच्याही पाठीवर हात ठेवत ‘चला येऊ कोल्हापूरला’ असे आश्वासन दिले.
दोघेही कोल्हापुरात पोहचले, त्यांनी कपिलतीर्थ मार्केटमधील शिवाजी जाधव, (कै) दत्ता जाधव, बाळू पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत साळोखे यांची भेट घेतली. शिवसेना स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. त्यासाठी मुंबईचे काका कुलकर्णी यांचे वरचेवर मोलाचे मार्गदर्शन लाभत होते. त्यावेळी चंद्रकांत साळोखे हे नगरसेवक होते. याचदरम्यान महाराष्ट-कर्नाटक सीमा लढा चांगलाच पेटला होता, या आंदोलनासाठी बाळासाहेब ठाकरे येणार हे निश्चित झाले, ते मुक्कामी पन्हाळा येथे येणार असल्याने कोल्हापूरचे नवे सैनिक झाडून कामाला लागले. सारे कोल्हापूर भगवे करण्याचा निर्धार बांधला गेला, यासाठी कपिलतीर्थ मार्केटमधील मित्र प्रेम मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिवाजीराव चव्हाण, रामभाऊ चव्हाण, मधुकर घोेडके यांच्याशी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर चर्चा झाली, तेही शिवसेनेत सामील झाले, साळोखे आणि चव्हाण यांची मने एकवटली. झाले, हळूहळू ताकद वाढत निघाली. तशी बाळासाहेब माने, राजेंद्र बकरे, कोंडीराम साळोखे, श्रीकांत बिरंजे, धनाजी बिरंजे, किरण शिराळे, दिलीप पाटील-कावणेकर, दत्ता टिपुगडे हेही शिवसेनेकडे आकृष्ट झाले. शेतकरी कामगार पक्षातील नाराज, सळसळणारा तरुण वर्गही शिवसेना पक्ष स्थापनेवेळी हाती लागला. ताकद वाढत निघाली, तसा सैनिकांचा जोमही वाढत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापुरातील पहिल्या सभेची तारीख निश्चित झाली, ती ०६ मे १९८६. सभा ऐतिहासिक बिंदू चौकात झाली. या सभेत त्यांनी सळसळत्या तरुण रक्ताला पक्षात सामील होण्याचे आवाहन केले. त्याचवेळी नगरसेवक चंद्रकांत साळोखे यांनी शिवसेनेत प्रवेश करून महासभेत आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवले. या विराट सभेचा चांगलाच परिणाम झाला. ग्रामीण भागात पहिली शाखा डोणोली (ता. शाहूवाडी) येथे सुरू झाली. पाठोपाठ बघता-बघता शाखा सुरू करण्याचा धडाका लावला. जिल्ह्यात तशी रामभाऊ चव्हाण यांची विविध माध्यमांतून ताकद होती, हीच ताकद ग्रामीण भागात शिवसेना पक्ष वाढविताना कामी आली.
ग्रामीण भागात राष्ट्रीय काँग्रेसचा मोठा प्रभाव होता. ग्रामीण भागात शिवसेना शाखा काढण्यासाठी जातानाच भाकरी, चटणी बांधून घेऊन साळोखे, चव्हाण बंधू जात होते. तेथे जाऊन शिवसेनेचे महत्त्व पटवून दिले जात होते, शिवसैनिक तयार करून शाखेचा फलक उभारूनच माघारी फिरायचे हा रोजचा कार्यक्रम. पण ग्रामीण भागात एखाद्या शाखेचा प्रमुख झाला की, त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी त्याच्या उसाचा पाणीपुरवठा बंद, डेअरीचे दूध संकलन बंद, सोसायटीचे कर्ज मिळणे बंंद असे दबावतत्र अवलंबले जात होते. शाखा स्थापन करून कोल्हापुरात पोहचेपर्यत तेथील शाखा जमीनदोस्त केलेली असायची. अशा पध्दतीने काँग्रेसच्या नेत्यांनी ग्रामीण भागात दहशत निर्माण केली व शाखा स्थापण्यात अडथळा आणला, पण नंतर जशाच तसे उत्तर देण्याचे सुरू केल्यानंतरच शाखा हळूहळू सुरू करण्याकडे नागरिकांचा लोंढा वाढू लागला. शिवसेनेला पहिला आमदार १९९० च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्राचार्य एम. आर. देसाई यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असणाऱ्या चांगल्या संबंधाचा फायदा दिलीप देसाई यांच्या रूपाने मिळाला. पुढील तीन वर्षातच देसाई हे काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्याने १९९५ ला उमेदवारी सुरेश साळोखे यांना मिळाली. त्यानंतर साळोखेे पाठोपाठ दोनवेळा विजयी झाले. हिंदुत्वाचा पगडा असणाऱ्या अंकुश ग्रुपच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांचाही शिवसेनेशी निकटचा संबध नेहमीच राहिला, प्रथम शहरप्रमुख व दोन वेळा ते आमदार झाले. दरम्यानच्या कालावधीत माजी महापौर रामभाऊ फाळके, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, श्रीमती निवेदिता माने, धनंजय महाडिक, विक्रमसिंह घाटगे, संजय घाटगे आदी दिग्गज नेते शिवसेनेत आले परंतु पण ते काही काळापुरतेच. आता शिवसेना जशी राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष बनली आहे तशीच ती कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिका, गोकूळ दूध संघ अनेक नगरपालिकांमध्येही सत्तेतील प्रमुख भागीदार म्हणून सहभागी झाली आहे. अंतर्गत गटबाजीचा शाप नसता तर शिवसेनेचा भगवा अजूनही ताकदीने फडकला असता..
-----------------------------
विधानसभेतील प्रतिनिधित्व
दिलीप देसाई (कोल्हापूर), बाबासाहेब पाटील -सरुडकर (शाहूवाडी). सुरेश साळोखे (कोल्हापूर शहर), संजय घाटगे (कागल), सत्यजीत पाटील (शाहूवाडी), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर), सुजीत मिणचेकर (हातकणंगले), चंद्रदीप नरके (करवीर), प्रकाश आबिटकर (राधानगरी-भुदरगड), उल्हास पाटील (शिरोळ)
लोकसभेतील प्रतिनिधित्व
संजय मंडलिक (कोल्हापूर), धैर्यशील माने (हातकणंगले)
जिल्ह्याची पहिली कार्यकारिणी
जिल्हा संघटक-रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत साळोखे. जिल्हा प्रमुख-सुरेश साळोखे, उपजिल्हाप्रमुख -शिवाजीराव चव्हाण, शहरप्रमुख- शिवाजीराव जाधव, उपशहरप्रमुख-बाळ घाटगे.
------------------------------------