कागल : येथील ग्रामदैवत हजरत गहिनीनाथ पीर उरुसानिमित्त छ. शाहू साखर कारखान्याच्यावतीने आयोजित भव्य कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल बाला रफीक याने दिल्लीचा हिंदकेसरी पै. सुमित यास २७व्या मिनिटाला समोरून आखाडी लावून चितपट केले. तर दुसऱ्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने सोलापूरच्या राजेंद्र राजमाने याच्यावर पोकळ घिस्सा डाव टाकत मात केली. येथील यशवंत किल्ला-मिनी खासबाग मैदानात उपस्थितीत हजारो कुस्तीशौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फिटणाऱ्या कुस्त्या झाल्या. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, विजयसिंह मोरे, भैया माने, दत्तामामा खराडे, बाळ पाटील, प्रकाश गाडेकर, आप्पासाहेब हुच्चे, आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कुस्त्यांचा प्रारंभ आणि बक्षीस वितरण करण्यात आले.प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत बाला रफीक आणि सुमित यांनी एकमेकांना काट्याची लढत दिली. ही कुस्ती जवळजवळ अर्धा तास चालली. शेवटी रफीकने सुमितला खाली घेतले. घुटना डावाने मानेचा कस काढीत त्यास जेरीस आणले. तर समाधान घोडकेने आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करीत १५ मिनिटांत राजमानेला आस्मान दाखविले. द्वितीय क्रमांकाची कुस्ती शाहू साखरचा मल्ल संतोष दोरवाड विरुद्ध मेहेर सिंग (दिल्ली) यांच्यात होती. अर्धातासाहून अधिक काळ ही लढत चालल्याने शेवटी बरोबरीत सोडविली, तर मनीष कुमार (दिल्ली) विरुद्ध विष्णू खोसे (क्रीडा प्रबोधिनी) यांच्यातील लढत विष्णू खोसे जखमी झाल्याने रद्द झाली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सतीश सूर्यवंशी याने हसन पटेलवर चटकदार विजय मिळविला. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या या मैदानात या प्रमुख कुस्त्यांसह जवळपास लहान मोठ्या मिळून दीडशे कुस्त्या झाल्या. मैदानाचे पूजन उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य पंच म्हणून राम सारंग, तर सर्जेराव मोरे, ईश्वरा पाटील यांनी निवेदन केले. पंच म्हणून बाजीराव पाटील, शंकर मेडशिंगे, संजय वाडकर, वस्ताद रंगा ठाणेकर, शिवाजी जमनीक, रामदास लोहार, संभाजी मगदूम, आदींनी काम पाहिले. शाहू साखर कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, पैलवान-वस्ताद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कागल येथे हजरत गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त शाहू कारखान्यातर्फे आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती विजेते बाला रफीक यांचा सत्कार करताना समरजितसिंह घाटगे. डावीकडून मनोहर पाटील, प्रकाश गाडेकर, भैया माने, दत्तामामा खराडे, बॉबी माने, आदी उपस्थित होते.
बाला रफीककडून सुमित चितपट
By admin | Updated: November 17, 2015 01:01 IST