शिरोळ : गतवर्षी हंगाम संपल्यानंतर लॉकडाऊनमुळे ऊसतोडणी मजुरांना गावाकडे जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिनाभर मजूर अडकून पडले होते. राज्य सरकारच्या निर्णयानंतर तपासणी करून ऊसतोड मजुरांना गावी पाठविण्यात आले होते. दरम्यान, यंदाही कोरोनाचे सावट असले तरी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून ऊसतोडी बंद होत आहेत. त्यामुळे गावाकडे जाण्यासाठी मजुरांची लगबग सुरू आहे.
ऊसतोडणीच्या निमित्ताने दरवर्षी राज्यातील जालना, बीड, परभणी यांसह इतर जिल्ह्यांतून ऊसतोडणी मजूर व साखर कारखान्यांतील अन्य कामगार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असतात. गतवर्षी हंगाम संपत असतानाच कोरोनाचे संकट आले होते. त्यामुळे महिनाभर मजूर अडकून पडले होते. त्यांची व्यवस्था संबंधित कारखान्याकडून करण्यात आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातून जवळपास चौदा हजार ऊसतोड मजुरांना राज्य शासनाच्या परवानगीनंतर त्यांची आरोग्याची तपासणी करून टप्प्याटप्प्याने त्यांच्या गावांकडे पाठविण्यात आले. त्यासाठी एस. टी. बसची सोय करण्यात आली होती.
सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. बहुतांश कारखान्यांच्या हंगामाची सांगता झाली आहे. त्यामुळे हंगाम बंद झालेल्या परिसरातील मजूर गावाकडे परतत आहेत. शिरोळ तालुक्यातील ऊसतोडी बंद झाल्या आहेत. त्यामुळे गतवर्षीचा अनुभव पाहता, सध्या मराठवाड्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या कहराच्या पार्श्वभूमीवर गावी जाण्यासाठी ऊसतोड मजुरांची लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी शिरोळमध्ये साहित्य भरून गावाकडे जाण्यासाठी ऊसतोड मजुरांची धांदल सुरू होती.
फोटो - २५०३२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - शिरोळ येथे गुरुवारी दत्त कारखान्याच्या परिसरात ऊसतोड मजुरांची गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू होती.
(छाया- सुभाष गुरव, शिरोळ)