अनिल पाटील
सरुड : लोकमत न्यूज नेटवर्क
जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे वारणा व कडवी नदीकाठाशेजारील सरूड परिसरामधील नुकसान झालेल्या बहुतांश क्षेत्रातील ऊस पिकाची अवस्था जळणासाठी वापरण्यात येणाऱ्या दांडक्यासारखी झाली आहे. महापुरामुळे वाया गेलेल्या या परिसरातील मळी रानामधील उसाचा जळण म्हणून वापर होऊ लागला आहे.
ऊस लागणीपासून शेतकऱ्यांनी ऊस पिकाची जीवापाड जोपासना केल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत सरूड परिसरातील वारणा व कडवी दोन्ही नदीकाठाशेजारील ऊस पीक जोमात होते. परंतु जुलै महिन्याच्या अखेरीस आलेल्या महापुरामुळे सरुड परिसरातील नदीकाठचे भात तसेच ऊस पीक आठ ते दहा दिवस पाण्याखाली राहिल्याने बहुतांश क्षेत्रामधील पीक पूर्णपणे कुजून गेले आहे. सध्या महापुरामध्ये बाधित झालेल्या उसाची अवस्था तर फारच बिकट झाली असून, या उसाचे रूपांंतर जळणात झाले आहे. महापुराने बाधित झालेला हा ऊस जनावरेही खात नसल्याने या उसाचा जळण म्हणूनच वापर होऊ लागला आहे.
नदीकाठाशेजारील बहुतांश क्षेत्रामध्ये मर लागलेल्या उसाची दांडकी कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. साखर कारखानेही गाळपासाठी असा बाधित ऊस तोडणार का? याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्रातील मर लागलेल्या उसाची खोडवी स्वत:हून तोडण्यास सुरुवात केली आहे. केवळ जळण म्हणूनच सध्या या बाधित उसाचा वापर केला जात आहे.
चौकट
महापुरामुळे ऊस पिकाची झालेली दयनीय अवस्था पाहून यापुढे नदीकाठाशेजारील मळी रानात उसाची लागवड करायची की नाही, याचा विचार करावा लागेल. कारण महापुरामुळे मळी रानातील ऊस पीक पूर्णपणे वाया गेल्याने आजपर्यंतच्या मशागतीसह बियाणे, खते यांचा सर्व खर्च अंगावर आला आहे. शिवाय पूरबाधित क्षेत्रातील कुजून गेलेला ऊस मजूर लावून तोडणी करावा लागणार असल्याने तो खर्चही शेतकऱ्यांसाठी न परवडणारा आहे. त्यामुळे यापुढे नदीकाठाशेजारील मळी रानात ऊस पीक घेणे, हा एक प्रकारचा मोठा जुगार ठरणार आहे.
= श्री. उदय महादेव पाटील, शेतकरी, सरूड
फोटो ओळी :
१ ) महापुरानंतर कडवी नदीकाठाशेजारील ऊस पिकाची अवस्था जळणासारखी झाली आहे.
२ ) महापुरानंतर कडवी नदीकाठाशेजारील मळीरानामधील कोलमडून वाया गेलेले ऊस पीक.
( छाया : अनिल पाटील, सरूड )