ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा प्रत्यय, कोल्हापूरचा पारा ३१ डिग्रीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:21 AM2020-06-25T11:21:41+5:302020-06-25T11:24:58+5:30
ऐन पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. सकाळी १० वाजता ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. तापमान ३१ डिग्रीवर गेले असून, किमान तापमानातही वाढ झाल्याने उष्मा वाढत आहे.
कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. सकाळी १० वाजता ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. तापमान ३१ डिग्रीवर गेले असून, किमान तापमानातही वाढ झाल्याने उष्मा वाढत आहे.
मृग नक्षत्रात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आठवड्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले. पावसाचा जोर पाहता पुराची भीती वाटत होती; मात्र आर्द्रा नक्षत्र निघाल्यापासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी उघडझाप सुरू होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून एकदमच खडखडीत ऊन पडत आहे.
तापमान वाढू लागले असून कमाल तापमान ३१ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. त्यातही किमान तापमान २३ डिग्रीपर्यंत असल्याने उष्मा जाणवत आहे. त्यामुळे सकाळी १० वाजताच अंगाला चटके बसत आहेत. ऐन पावसाळ्यात नागरिकांना ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. दिवसरात्र पारा वाढत जात आहे.
येत्या दोन दिवसांत तापमान कायम राहणार असून किमान तापमानात थोडी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
आगामी चार दिवसांत असे राहील तापमान डिग्रीमध्ये -
दिवस किमान कमाल हवामान
- गुरुवार २४ ३२ ऊन
- शुक्रवार २४ ३१ ऊन, काहीसे ढगाळ
- शनिवार २३ ३२ ढगाळ