कोल्हापूर : दुधगंगा नदीवरील निढोरी, कूर कालव्यावर उद्या शुक्रवारपासून मंंगळवार (दि. १६) पर्यंत पाच दिवस उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी सकाळी ८ पासून या कालव्यातून केवळ पिण्याच्याच पाण्याचा उपसा करता येणार आहे. बंदी असलेल्या कालावधीत शेती व औद्योगिक कारणासाठी उपसा केल्यास कारवाईचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
काळम्मावाडी धरणातील निढोरी शाखा व कूर शाखा कालव्यातील पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी या महिन्यातील हे उपसाबंदीचे नियोजन करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. दुधगंगा उजवा कालव्यावरील (मुख्य कालवा) १ ते २४ किलोमीटरपर्यंत ऐनी, आटेगाव, सावर्डे-पाटणकर, कासारपुतळे, कासारवाडा, ढेंगेवाडी, धामणवाडी, सरवडे, उंदरवाडी, बोरवडे या गावात शेती व उद्योगासाठी मंगळवारी सकाळी आठपर्यंत पाणी उपसता येणार नाही. अनधिकृतपणे उपसा केला, तर उपसायंत्रे जप्त करण्यासह उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, दुधगंगा कालव्यातील आवर्तन पूर्ण करण्याच्यानिमित्ताने जिल्ह्यात चालू वर्षातील ही पहिलीच उपसाबंदी आहे. जिल्ह्यात सलग दोन वर्षे चांगला पाऊस पडल्याने धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पाणीटंचाईची कुठे झळ बसणार नाही, असे आश्वासक चित्र आहे. तरीदेखील ही उपसाबंदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आश्चर्य व्यक्त होत आहे.