कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे, तर काहींचा आतापासून पत्ते खोलून खिसा रिकामा न करता अंतिम टप्प्यात उमेदवारी जाहीर करण्याचा डाव आहे. सर्वच पक्षांतील नेत्यांनी मनी आणि मसल पॉवर आणि विजयी होण्याची क्षमता असणाऱ्या तगड्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला काटावरचे बहुमत मिळाले. याउलट भाजप - ताराराणी आघाडीला ३३ नगरसेवक असूनही विरोधी बाकांवर बसावे लागले. परिणामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जास्तीत जास्त जागा आणून एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार केला आहे, तर शिवसेनेनेही महापौरपदावर दावा केला आहे. यासाठी तगडे उमेदवार देण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. नवीन उमेदवाराला संधी देऊन धोका न पत्करता आजी-माजी नगरसेवकांना रिंगणात उतरवण्याचा कल सर्वच पक्षांचा आहे. यामुळे विरोधी आघाडीतील तगडे उमेदवारच फोडण्याचा प्रकार सुरू आहे.
चौकट
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांचा सर्वाधिक ओढा आहे. भाजप - ताराराणी आघाडीच्या कट्टर कार्यकर्त्यांनी मात्र पक्षातूनच निवडणूक लढविणाच्या निर्धार केला आहे. अंतिम टप्प्यात काँग्रेस, राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळालेल्या नाराजांवर त्यांची नजर असणार आहे.
चौकट
१५ मार्च रोजी निवडणुकीची चर्चा
महापालिका वर्तुळात पुढील महिन्यांपासून निवडणूक प्रक्रिया गतिमान होणार असून, १५ मार्च रोजी मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्यामुळे महापालिकेचीही निवडणूक पुढे जाईल, असा अंदाज काहींनी बांधला होता. मात्र, तसे होईल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सर्वच पक्षातून पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. जाहीर सभा, पक्ष प्रवेश केले जात आहेत.