अमर पाटील :
कळंबा :
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वात हायव्होल्टेज असणारा प्रभाग ७४, सानेगुरुजी वसाहत हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने या प्रभागातून महापालिका गाठण्यासाठी इच्छुकांच्या उड्या पडू लागल्या आहेत. या प्रभागात काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांना रोखण्यासाठी भाजप सर्व ताकद पणाला लावण्याची शक्यता असून शिवसेना आणि राष्ट्रवादीही जोरकसपणे मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याने या मतदारसंघाकडे अवघ्या शहराचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे २००५ व २०१० च्या निवडणुकीत एकमेकांसमोर लढलेले उमेदवारच पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याने येथील निवडणूक रंगतदार होणार आहे.
२००५ व २०१० मध्ये काँग्रेसचे शारंगधर देशमुख, भाजपचे संजय सावंत व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सुनील देसाई यांच्यात लढत झाली होती. पंचवीस लहानमोठ्या कॉलन्यात विस्तारित प्रभागात सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर तसेच मुस्लिम समाजातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरते. येथे पक्षीय तसेच गटातटाच्या राजकारणापेक्षा उमेदवार आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर निवडणूक होते.
गतवेळच्या निवडणुकीत हा प्रभाग इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव झाला होता. त्यावेळी चार पक्षांच्या चार महिला रिंगणात होत्या. मात्र, भाजपच्या मनीषा कुंभार आणि काँग्रेसच्या माधुरी लोखंडे यांच्यात खरी लढत होऊन भाजपच्या मनीषा कुंभार मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या तेजश्री पाटील यांनीही चांगली मते घेतली होती. त्यावेळी मतविभागणीचा मोठा फटका काँग्रेसच्या उमेदवारास बसल्याने भाजपने काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यात यश मिळवले होते.
यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने येथे इच्छुकांच्या उड्या पडत आहेत. काँग्रेसकडून शारंगधर देशमुख पुन्हा मैदानात उतरले असून त्यांनी तयारी सुरू केली आहे. गतनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्याने भाजपला उभारी मिळाली असून भाजपसुद्धा दुसऱ्यांदा गड राखण्यासाठी रिंगणात उतरली आहे. भाजपचे संजय सावंत या प्रभागातून इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील देसाई यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर शिवसेना तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र आहे . गतवेळचा प्रभाग ७५ आपटेनगर अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनीही येथून चाचपणी सुरू केली आहे. ऐनवेळी राजू दिंडोर्ले निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास निवडणूक रंगतदार वळणावर जाण्याची शक्यता आहे.
गतनिवडणूकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : मनीषा कुंभार - भाजप १९२४, माधुरी लोखंडे - काँग्रेस १४२१, तेजश्री पाटील -शिवसेना ७७२,
नेहा भुर्के - राष्ट्रवादी काँग्रेस १८९,
प्रभाग ७४, सानेगुरुजी वसाहत,
विद्यमान नगरसेविका - मनीषा कुंभार,
आताचे आरक्षण : सर्वसाधारण.
प्रभागातील समस्या १) मुख्य रस्त्यांसह कॉलनी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था २) रखडलेला चाळीस लाखांचा महिला जिमचा प्रकल्प
३)खुल्या आरक्षित जागा विकसित झाल्या नाहीत.
४) कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा. ५) नाल्यावरील अतिक्रमणामुळे नागरी वस्तीत पावसाळ्यात पाणी ६) वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस ठाणे गरजेचे ७) कचरा उठावातील अनियमितता.
सोडवलेले प्रश्न १) उपनगरातील रस्त्यावरच्या भाजीमंडईस आळा बसावा यासाठी प्रभागात ६० लाखांच्या अत्याधुनिक मंडईची उभारणी २) राजोपाध्येनगरातील क्रीडांगणास संरक्षक भिंत व बैठक व्यवस्था उभारणी ३) प्रभागातील ड्रेनेज व पाणीप्रश्न बहुतांश मार्गी ४) रस्ते ,गटारी , पाणीप्रश्न बहुतांश मार्गी
५) संपूर्ण प्रभागात एलइडी पथदिवे ६) संपर्क कार्यालयाद्वारे नागरी समस्यांचे निर्मूलन
कोट :
गेल्या पाच वर्षांत प्रभागात चार कोटींची विकासकामे पूर्णत्वास नेऊन बहुतांश प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. पालिकेच्या सत्ता- समीकरणातील राजकारणाचा व निधीवाटपातील दुजाभावाचा फटका विकासनिधी मिळवण्यावर व विकासकामांवर झाला.
मनीषा कुंभार, नगरसेविका
फोटो : ०२ प्रभाग क्रमांक ७४
प्रभागात उभारण्यात येणाऱ्या उपनगरातील महिला व युवतींसाठीच्या ४० लाखांच्या महिला जिमचे काम आठ वर्षे निव्वळ राजकीय श्रेयवादात रखडले आहे.