कोल्हापूर : अन्नसुरक्षा कायदा लागू झाल्यापासून केशरी कार्डधारकांच्या धान्याची नाकाबंदी केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांत केवळ चार किलो धान्य दिले आहे. या कार्डधारकांची झोळी रिकामी न ठेवता त्यांना पूर्ववत १५ किलो धान्य मिळालेच पाहिजे, अशा मागणीचे निवेदन येथील कोल्हापूर जनशक्तीतर्फे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे यांना नुकतेच देण्यात आले. अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लागू झाली आहे. कोल्हापूर शहरातील १ लाख ४३ हजार ७२ कार्डधारकांपैकी ७८ हजार ३५८ कार्डधारक या योजनेच्या बाहेर फेकले गेले आहेत. त्यांना पूर्वीप्रमाणे धान्य देण्याचे जाहीर करूनही शासनाने गेल्या सहा महिन्यांत या कार्डधारकांची बोळवण केली आहे. म्हणूनच काल, बुधवारी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने सहायक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्यांचे निवेदन दिले.केशरी कार्डधारकांना पूर्ववत १५ किलो धान्य द्यावे, अन्नसुरक्षा लाभार्थ्यांचा सर्व्हे सदोष असून, त्याचे फेरसर्वेक्षण करावे, दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय कुटुंबांना प्रतिकुटुंब ३५ किलो धान्य द्यावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. शिष्टमंडळाशी बोलताना देशपांडे यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, आपले म्हणणे यापूर्वी शासनाकडे पाठविले आहे. अन्नसुरक्षा लाभार्थी यादी अंतिम नसून, जे कोणी लाभार्थी वंचित आहेत, त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावेत, त्यांचा समावेश करून घेण्यात येईल, असे सांगितले. शिष्टमंडळात समीर नदाफ, दिलीप पाटील, एम. डी. कुंभार, तय्यब मोमीन, राजन पाटील, तुकाराम भालेकर, बाळासो शारबिद्रे, संतोष आयरे, रियाज कागदी, बादशाह सय्यद, आदींचा समावेश होता.
केसरी कार्डधारकांची चेष्टा थांबवा
By admin | Updated: December 11, 2014 23:44 IST