लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशात २०१४ ला पुरोगामी विचाराचा वटवृक्ष ढासळला आणि प्रतिगामी शक्ती पुढे आली. बघता बघता त्यांनी भारत ताब्यात घेतला. मात्र, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराने चालू इच्छिणाऱ्या मंडळी एकत्र आल्या आणि चांगल्या विचाराने पुढे जात आहेत. प्रतिगाम्यांविरोधात जिल्ह्यासह राज्यात असेच एकसंधपणे राहा, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी केले.
काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शाहू बोर्डिंग येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे संयोजक आमदार पी. एन. पाटील म्हणाले, गेली २८ वर्षे राजीव गांधी यांची जयंती साजरी करत आहोत. आजच्या परिस्थितीत राजीव गांधी यांचे विचारच देशाला वाचवू शकणार आहेत. केंद्रातील सरकारने देशाच्या मालकीच्या मालमत्ता विकण्याचा सपाटा लावला असून काही शिल्लक ठेवतील की नाही, याची भीती सामान्य माणसाच्या मनात आहे.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, देशात डिजिटल इंडियाची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. एकीकडे डिजिटल क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण विकासाला बळकटी देणारी पंचायत राज व्यवस्था सक्षमपणे राबवली. त्यांचे विचार घेऊनच आजच्या पिढीला पुढे जायचे आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजीव गांधी यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. मात्र, ‘बोफोर्स’मुळे काही आरोप झाले. न्यायालयीन चौकशीत ते निर्दोष सुटले तरीही त्यांच्या मानेवरून बोफोर्सचे भूत उतरले नाही. ‘राफेल’मध्ये किती घोटाळा झाला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याची चौकशीही होत नाही. मात्र, राफेलचे भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानेवरून उतरणार नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी आभार मानले. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व सद्भावना ज्योत प्रज्वलन शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. राहुल पाटील, मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिक्षण सभापती रसिका पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, व्ही. बी. पाटील, उदयसिंह पाटील-काैलवकर, मानसिंग बोंद्रे, प्रल्हाद चव्हाण, ॲड. सुरेश कुराडे, उदयानी साळुंखे, सुप्रिया साळोखे, संध्या घोटणे, बबन रानगे, एस. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.
अखंडितपणे जयंती साजरे करणारे ‘पी. एन.’ एकमेव
राजीव गांधी जयंती अखंडितपणे २८ वर्षे साजरी करणारे पी. एन. पाटील हे देशात एकमेव असल्याचे गौरवोद्गार शाहू छत्रपती, मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही
महापुरामुळे अंशत: पडझड झालेल्या घरांनाही पूर्ण भरपाई मिळणार असून पुनर्वसनासाठी ‘शबरी’, ‘रमाई’ योजनेतून आराखडा केला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीला सुरुवात करणार आहे, एकाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधकांनी राजकारण करू नये, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार देणारच
कोविडमुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. ११ हजार कोटींचे उत्पन्न आणि १४ हजार कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आघाडी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देणारच, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
मानाच्या दिंडीत मलाही सामील केले
दरवर्षी दिंडनेर्लीच्या माळावर पांडुरंगाच्या भक्तीसाठी कार्यकर्त्यांच्या दिंड्या येत असल्याचे बाळासाहेब खाडे यांनी सांगितले. हाच धागा पकडत यंदा मला मानाच्या दिंडीत सहभागी करून घेतल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी ‘पी. एन.’ यांचे आभार मानले.