इचलकरंजी : अंगणवाडी सेविका व मदतनिसांना कोविड काळात सर्व्हे व इतर कामाची सक्ती करू नये. सेविकांना काम करूनही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. या विविध मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करूनही शासनाने दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बुधवारी (दि.२६ मे) राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या अध्यक्षा जयश्री पाटील व सरचिटणीस आप्पा पाटील यांनी दिली.
कोरोनाकाळात काम करताना मृत्यू झाल्यास सेविकांना विमा संरक्षणाची ५० लाखांची मदत मिळावी. पोषण ट्रॅकर अॅप मराठीत असावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानसार २६ मे रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत जिल्ह्यातील १०० गावांतील अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतींसमोर सेविका, मदतनीस शासनाचे नियम पाळून निदर्शने करतील.