कोल्हापूर : महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या वकिलांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुढचे पाऊल टाकले आहे. ही हत्तीण नांदणी मठाकडे परत पाठवण्यासाठी उच्चाधिकार समितीकडे अनुमती मागण्याची मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी विनंती केली आहे.हे प्रकरण सुचीबद्ध झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या हत्तीणीसंदर्भातील सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारच्या वकिलांनी बदललेली परिस्थिती, घटनाक्रम आणि नवी भूमिका मांडली. ती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऐकून घेतली. यासंदर्भात पुढील सुनावणी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महादेवी हत्तीणीला नांदणीत परत आणण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वकिलांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयाकडे वन्यप्राण्यांसाठी असलेल्या उच्चाधिकार समितीकडे अनुमती देण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यावर हे प्रकरण सुचीबद्ध करण्यासाठी न्यायालयाने सहमती दर्शवली होती.याप्रकरणी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारचे वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सर्वाेच्च न्यायालयाचा आदर करत नांदणी मठाने ‘महादेवी हत्तीणी’ला २८ जुलै रोजी जामनगर येथील 'वनतारा'च्या राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवल्याचे स्पष्ट करून त्यानंतर बदललेल्या भूमिकेचा आणि त्यासंदर्भातील घडलेले घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.नांदणी मठाच्या मागणीला राज्य सरकार आणि वनतारा यांचा आक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात उच्चाधिकार समितीकडे हत्तीण परत नांदणी मठात पाठवण्यासाठी अनुमती द्यावी, अशी भूमिका मांडली. यासंदर्भात न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती नांदणी मठाचे वकील ॲड. मनोज पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ॲड. सिद्धार्थ धर्माधिकारी, नांदणी मठाकडून ॲड. मनोज पाटील, ॲड. सुंधांशू चौधरी, ॲड. आनंद लांडगे वनताराकडून ॲड. शार्दूल सिंग आणि ॲड. बलबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.
‘माधुरी’ला वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.