कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व माहिती संकलित केली आहे. लवकरच काही तरी चांगला निर्णय होईल, अशी अपेक्षा करू या, अशा शब्दांत महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शहराच्या हद्दवाढीचे संकेत दिले.शहराच्या हद्दवाढीला विरोध करतात, म्हणून ग्रामीण भागातील नळकनेक्शन तोडणे आणि त्यांची केएमटीची बस सेवा बंद करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचेही प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी स्पष्टपणे सांगितले.सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी प्रशासक मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली आणि हद्दवाढीला विरोध करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची थकबाकी का वसूल केली नाही, त्यांची नळकनेक्शन का तोडली नाहीत, केएमटी बस सेवा का बंद केली नाही, तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर का कारवाई केली नाही, असे प्रश्न त्यांना विचारले.हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक होऊ नये, अशी आमची मागणी असल्याचे सांगत आर. के. पोवार यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावावर प्रशासकांनी सही केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हद्दवाढीसाठी प्रशासनानेच आग्रही भूमिका घेतली पाहिजे, असे सांगतानाच जी गावं विरोध करतात त्यांच्या सुविधा बंद करा, असे सचिन चव्हाण यांनी सांगितले.महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव चुकीचा आहे, बरोबर आहे की त्यात काही त्रुटी आहेत, यापैकी काही सरकारने कळविले आहे का? अशी विचारणा दिलीप देसाई यांनी केली. हद्दवाढीला विराेध करणाऱ्या गावांतील पाणी कनेक्शन तोडा, त्यांची थकबाकी वसुली करा, अशी आग्रही मागणी बाबा इंदूलकर यांनी केली. आंदोलनात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी बाबा पार्टे यांनी केली.केएमटी बंद करणे अशक्य - मंजूलक्ष्मीग्रामिण भागातील केएमटी बस सेवा, पाणीपुरवठा कनेक्शन फार वर्षांपूर्वीपासून दिलेली आहेत, ती अचानक बंद करता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण मंजूलक्ष्मी यांनी दिले. थकबाकी वसुली दंडासह करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हद्दवाढ निर्णयाची प्रतीक्षा करूयाहद्दवाढीचा प्रस्ताव देऊन प्रशासनाने आपली बाजू राज्य सरकारकडे मांडली आहे. नगरविकास विभागाच्या सचिवांनी सर्व माहिती आमच्याकडून घेतली आहे. सरकार हद्दवाढ करण्यास सकारात्मक आहे. चांगली बातमी येईल, अशी अपेक्षा करू या, हद्दवाढीचा निर्णय होण्याची प्रतीक्षा करू या, असे मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.