कोल्हापूर : एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी येत नसताना आता दुसरीकडे ‘झिका’ व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये १३ झिकाचे दूषित रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाने याबाबत आणखी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत; मात्र या आजारामुळे रुग्णालयात भरती होण्याची गरज नाही किंवा यामुळे मृत्युचेही प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डासाच्या माध्यमातून हा आजार होत असल्याने स्वच्छता ठेवण्याची गरज आहे.
अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरलेली नाही. प्रशासन आपल्या परीने यासाठी प्रयत्नशील आहे; परंतु एकीकडे सर्व व्यवहार सुरू करण्यासाठीचा दबाव आणि रुग्ण आणि मृत्युसंख्या यामध्ये जिल्हा गुरफटून गेला आहे. गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र झिकाबाबत आरोग्य विभागाने दक्षता घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
चौकट
लक्षणे
या आजाराची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात.
१ ताप येणे
२ अंगावर रॅश उठणे
३ डोळे येणे
४ सांधे व स्नायुदुखी, थकवा येणे
५ डोकेदुखी
ही सर्व लक्षणे सौम्य स्वरूपाची असून ती २ ते ७ दिवस राहतात.
चौकट
कशामुळे होतो
झिका हा डासामार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. तो १९४७ साली युगांडामधील काही माकडांमध्ये आढळला होता. १९५२ मध्ये युगांडा आणि टांझानियामध्ये तो पहिल्यांदा माणसामध्ये आढळला. एडिस डासामार्फत तो पसरतो.
चौकट
उपाययोजना
यावर विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही; परंतु लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.
१ रुग्णाला पुरेशी विश्रांती द्यावी
२पुरेशा प्रमाणात पातळ पदार्थांचे सेवन करावे
३ तापाकरिता पॅरासिटामॉल औषध वापरावे
कोट
झिका आजार हा डासामुळे पसरतो. याच डासामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजाराचाही प्रसार होतो. हा डास महाराष्ट्रत विपुल प्रमाणात आढळतो. त्यामुळे एडिस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आवश्यक ती फवारणी गावागावात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर