कोल्हापूर : पूरबाधित नागरिकांसाठी ‘व्हाइट आर्मी’तर्फे व ॲस्टर आधार हाॅस्पिटलसह विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने आंबेवाडी (ता. करवीर) येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे गुरुवारी आयोजन केले होते. त्याचा लाभ १२५ हून अधिक स्त्री- पुरुषांनी घेतला.
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र महापूर आला होता. या महापुरात कोल्हापूर शहरालगतच्या आंबेवाडी गावालाही मोठा तडाखा बसला. गेल्या चार दिवसांपासून पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सर्व जनजीवन पूर्वपदावर येत असताना आरोग्याच्या समस्यांना आंबेवाडी ग्रामस्थांना सामोरे जावे लागू नये. याकरिता व्हाइट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ॲस्टर आधार हाॅस्पिटल, कोल्हापूर, मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स, नेहा, निमा व मर्दा सीआर फाउंडेशन, अशा संस्थांची मदत झाली. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर, डाॅ. मन्सूर अली, डाॅ. आफ्रिन नायकवडी, डाॅ. गिरीश नागरे, डाॅ. शिवराज देसाई, नवीन अग्रवाल, प्रदीप गायकवाड, ओजस पवार, आईशा राऊत आदींनी सहकार्य केले.
फोटो : २९०७२०२१-कोल-आंबेवाडी
ओळी : आंबेवाडी (ता. करवीर) येथे पूरग्रस्त नागरिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू नये, याकरिता व्हाइट आर्मीच्या वतीने गुरुवारी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.