आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : स्पीड रेसिंगमधील ९ व्या ‘दक्षिण डेअर रॅली’चे २० जुलै रोजी दुपारी ३ वाजता शेंडा पार्क मैदानावर आगमन होणार आहे. इचलकरंजी येथील आॅरिबिट रेसिंगचे अजित भिडे आणि नासर जमादार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राष्ट्रीय पातळीवरील ही रॅली आज, सोमवारी बंगलोर येथून निघणार असून, एकूण २३०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. २० जुलै रोजी सकाळी ६ ते दुपारी १ या कालावधीत ४० कारचालक आणि ३० पेक्षा अधिक दुचाकीस्वार तुर्केवाडी, तिलारीनगर (ता. चंदगड) येथे ७५ कि लोमीटरचा प्रवास करतील. दाट धुके, मुसळधार पाऊस आणि वळणाचे खडतर रस्ते यामुळे या वाहनचालकांचा कस लागणार आहे. यानंतर दुपारी ३ वाजता शेंडा पार्क येथे हे सर्वजण येणार असून, या ठिकाणी ‘सुपर स्पेशल स्टेज’प्रकारातील थरार वाहनप्रेमी नागरिकांना पहावयास मिळणार आहे.
चारचाकी गटामध्ये गतवर्षीचा हिमालयीन कार रॅली विजेता सुरेश राणा, तर दुचाकी गटामध्ये टीम टीव्हीएसचे तन्वीर आणि नटराज हे मुख्य आकर्षण असतील. भिडे, जमादार आणि राहुल पाठक हे बेळगाव ते कोल्हापूर विभागातील रॅलीचे व्यवस्थापन करत आहेत. मारुती सुझुकी यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे.