कागल : करदात्याच्या नावाने मेळावा घेऊन आमच्यावर टीका केली आहे. मात्र, कोणी कशीही टीका करू दे, त्याचा परिणाम होणार नाही. सुगी आली की, जसे नंदी बैलवाले, कुडमुडे जोशी, वगैरे येतात, तसे निवडणुका आल्या की, काहीजण येतात आणि जातात, अशी टीका जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार संजय घाटगेंचे नाव न घेता आज, सोमवारी केली. येथील शाहू सभागृहात आयोजित विविध योजनांमधील लाभार्थ्यांना अनुदान वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युवराज पाटील होते. यावेळी केंद्र शासन पुरस्कृत शौचालय बांधकाम अनुदान, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत रमाई आवास घरकुल योजना लाभार्थ्यांना अनुदान वाटप आणि निवारा साहित्य म्हणून ब्लँकेटस्, सतरंजी, सोलर कंदील वाटप, संजय गांधी निराधार योजना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब जनतेला मिळणारा लाभ काहींना सहज मिळत नाही. ते या कामाच्या आड येतात. जनतेची दिशाभूल करतात. नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी स्वागत केले, तर रमेश माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रकाश गाडेकर म्हणाले, शौचालय उभारणी अनुदानास विरोध करणाऱ्यांना जनतेने दारात उभे करून घेऊ नये, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैया माने यांनी, करदात्यांचा मेळावा घेऊन संजय घाटगेंनी गरिबांना चोर म्हटले आहे, असा आरोप केला. शाहू आघाडीचे मनोहर पाटील यांनी राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीच्या आघाडीबद्दलची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, पांडुरंग सोनुले, मारुती मदारे, आशाकाकी जगदाळे, अजित कांबळे, संजय चितारी, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) मुश्रीफ म्हणाले, कागलच्या विकासासाठी विक्रमसिंह राजेंची आणि आमची युती झाली. राजेंच्या मार्गदर्शनामुळेच कागलचा विकास होत आहे. २८ जुलैला त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना आताच शुभेच्छा देतो. कारण अजून राजेंचे आमंत्रण आलेले नाही.
निवडणुकीपुरतेच काहीजण उगवतात - हसन मुश्रीफ
By admin | Updated: July 22, 2014 00:40 IST