कोल्हापूर : एकतर चुकीचे आरोप करून बदनामी करायची आणि कोल्हापुरात येऊन संताजी घोरपडे कारखान्यावर जाण्याचे आव्हान किरीट सोमय्या देत असतील तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रतिआव्हान देईल. आम्ही निश्चितच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने वाटचाल करणाऱ्या सुसंस्कृत पक्षाचे कार्यकर्ते आहोत; मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानाला कोणी आव्हान देत असेल तर त्याला कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले की, सामान्य माणसाचे संसार उभे करण्यासाठी ज्या नेत्याने उभे आयुष्य खर्ची केले, ते अशा बिनबुडाच्या आरोपाला घाबरत नाहीत. कोल्हापूरच्या स्वाभिमानाला आव्हान देत, सोमय्या कोल्हापुरात येत आहेत. त्यांनी येथे यावेच, किती ‘झेड’ दर्जाची सुरक्षा असू देत, त्यांना रेल्वे स्टेशनपासूनच उद्रेकाला सामोरे जावे लागेल. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, उपाध्यक्ष मधुकर जांभळे, जहिदा मुजावर, जयकुमार शिंदे, सुनील देसाई, रमेश पोवार आदी उपस्थित होते.
भाजप नेत्यांचेही काळेबेरे बाहेर काढू
सोमय्या कोल्हापुरात यायला ते काय तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत का? आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही, गणपतीबरोबर अशा प्रवृत्तीला विसर्जित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्थानिक भाजप नेत्यांच्या साखर कारखाने व इतर संस्थांमध्ये काळेबेरे आहे, ते बाहेर काढू, असा इशारा राजेश लाटकर यांनी दिला.
युवकांचं ठरलंय.....
नेत्यांनी संयमाची भूमिका घेण्यास सांगितले, तरी आता थांबणार नाही. राष्ट्रवादी युवकांचे ठरलंय, कोल्हापुरात पाय ठेवल्यापासून सोमय्यांना हलता येणार नाही, असा इशारा आदिल फरास यांनी दिला.