कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन, भूकंप सूचक यंत्र, बर्म्युला ट्रँगलचे गूढ, सूर्यमाला व तारांगण, लोकसंख्या आदी विषयांचा वेध घेणारी वैज्ञानिक उपकरणे...ते पाहण्यासाठी उसळलेली विद्यार्थी, शिक्षक, पालकांची गर्दी...त्यातून मिळणारा सामाजिक प्रबोधनाचा संदेश असे चित्र आज, बुधवारी पेटाळा येथील विज्ञान प्रदर्शनात पाहायला मिळाले. शिवाजी पेठेतील पेटाळा येथील विमल गोयंका इंग्लिश मेडियम स्कूल येथे महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते, सदस्य समीर घोरपडे, भरत रसाळे, जहॉँगीर पंडत, प्र. प्रशासन अधिकारी बी. एम. किल्लेदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. महापौर माळवी म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळणे, बालवैज्ञानिक तयार करणे या गरजेतून होत असलेले हे प्रदर्शन स्तुत्य आहे. निश्चितच याचा लाभ विद्यार्थ्यांना भविष्यात होणार आहे. यावेळी संजय मोहिते, समीर घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ५ वी ते इयत्ता ७वीचे विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक असे दोन गट करण्यात आले आहेत. प्रदर्शनात महापालिकेच्या ७६ शाळांतील विद्यार्थ्यांनी व २० शिक्षकांनी भाग घेतला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र विद्यालय, कसबा बावड्याच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले कचरा विलगीकरणाचे यंत्र, श्रीधर सावंत विद्यामंदिरचे ब्रीज गार्डन शेती, प्रिन्स शिवाजी विद्यामंदीरचे जैविक घनकचऱ्याचे विविध उपयोग, यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे भूकंपसूचक यंत्र, वीर कक्कया विद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन उपकरण, मुलींची शाळा नं.७ कसबा बावडयाच्या विद्यार्थिनींनी अग्निरोधक झोपडी, शहाजी पाटील यांनी आकृत्यांची गंमत जोडी, अशी उपकरणे लक्ष वेधत होती. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
विज्ञान प्रदर्शनातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश
By admin | Updated: December 18, 2014 00:02 IST