लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोटस मेडिकल फाऊंडेशन आणि कल्पतरू ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'जोडो' प्रकल्पांतर्गत ४८ विशेष मुलांना स्मार्टफोन वाटप करण्यात आले. त्यामुळे विशेष मुलांचे ऑनलाईन शिक्षण आता बऱ्यापैकी सोपे झाले आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मुलांचे शिक्षण आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रशासनासमोर ऑनलाईन शिक्षण कसे राबवायचे हा प्रश्न होता तिथे लोटस मेडिकल फाऊंडेशनने कोल्हापूरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मुलांपर्यंत जोडो प्रकल्पांतर्गत पोहोचून हा प्रश्न मार्गी लावला. मुलांचे मनोगत ऐकल्यानंतर त्यांना शिक्षण हवे आहे हे ऐकून खूप समाधान वाटले, असेही त्या म्हणाल्या.
या प्रकल्पाचे समुपदेशक सलमान मुजावर यांनी मुलांबद्दल व प्रकल्पाबद्दलचे अनुभव मांडले. फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा थोरात यांनी स्वागत केले. संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शहा यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली व जोडो प्रकल्पाची संकल्पना विषद केली.
स्मार्टफोन दिलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनोगत मांडले. कल्पतरू ट्रस्टच्या विश्वस्त आणि सिपला फाऊंडेशनच्या प्रमुख रुमाना हमीद व अनुराग मिश्रा यांनी मुलांचे मनोगत ऐकून आनंद व्यक्त केला. डॉ. संजय ओक-अध्यक्ष, कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. लंडनचे हॉवर्ड जॉन्स, बाल आशा ट्रस्टचे सुनील अरोरा, माझगाव डॉकचे रोहित पांड्या यांनीही या जोडो प्रकल्पाचे कौतुक केले व संस्थेच्या कामाबद्दल संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. लोटस संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले.