जयसिंगपूर : येथील नांदणी रोड व शिरोळ वाडी रोडवर रस्त्याकडेला भाजी विक्री करणाऱ्यांवर शनिवारी जयसिंगपूर पालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाईची मोहीम राबविली. कारवाई सुरू असताना काही विक्रेत्यांनी विरोध केल्याने गोंधळ उडाला होता. मात्र, पालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली.
जयविजय शाळा ते दहावी गल्ली या मार्गावर दैनंदिन भाजी व फळ विक्रेते बसत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेटस् लावून हा मार्ग काही दिवस बंद करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी भाजी विक्री बंद झाली होती. फिरून भाजीपाला विक्री करावी, असे आदेश प्रशासनाने दिले असतानाही नांदणी रोड व शिरोळवाडी रोडवर भाजी विक्री करणाऱ्यांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीबरोबरच नागरिकांची गर्दीदेखील होत होती. शिवाय, वाहनांचा धूर आणि धुळीतच भाजी विक्री होत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना या दोन्ही मार्गावर बसण्यास मज्जाव केला. भाजी मंडई असताना त्या ठिकाणी जाऊन विक्री करावी, अशा सूचना दिल्या. मात्र, काही भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाच्या कारवाईला विरोध दर्शविला. रस्त्यावर पुन्हा भाजी विक्रेते बसल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
फोटो - १००७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे शनिवारी शिरोळवाडी रोडवर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना प्रशासनाने मज्जाव केला.