कोडोली : नावली (ता. पन्हाळा) येथे प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पिस्तूलने गोळी झाडल्याने विनोद अशोक पाटील (वय ३९) यांच्या मांडीत गोळी लागल्याने ते जखमी झाले. याबाबत जखमी विनोद यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.याप्रकरणी गोळीबार करणारा नीलेश राजाराम मोहिते (रा. नावली) यास पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी सकाळी ९:३० वाजता नावली येथे घडली. विशेष म्हणजे हल्लेखोरानेच जखमी पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.फिर्यादी आणि आरोपी हे मेहुणे-पाहुणे आहेत. नीलेशच्या बहिणीसोबत फिर्यादी विनोद पाटील यांनी २०१४ मध्ये प्रेमविवाह केला होता. यावरून दोन कुटुंबांत वाद होता. दोघांची घरे जवळच आहेत. सोमवारी फिर्यादी गल्लीत पोस्टर लावत होता. यावरून दोघांत वाद झाला. यावरून आरोपीने घरातील पिस्तूल आणून एक गोळी हवेत, तर दुसरी विनोदच्या अंगावर झाडली. ही गोळी विनोदच्या उजव्या मांडीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.घटना घडल्यावर आरोपीनेच फिर्यादीला कोडोली येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये आणले. पोलिसांना घटनेची माहिती कळताच रुग्णालयातून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावले असून, रक्ताच्या चाचणीसाठी कार्यवाही सुरू आहे. पुढील तपास सपोनि कैलास कोडग हे करत आहेत.
चार दिवसांतील दुसरी घटनासंभापूर येथे शनिवारी वादातून हवेत गोळीबार घडल्याची घटना घडली होती. यानंतर सोमवारी नावली येथे गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.