शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

...म्हणून म्हणावंसं वाटतं; 'पवार साहेब, तुमचं चुकलंच!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 19:58 IST

शरद पवार यांनी राजकारणात नात्याचा, मैत्रीचा संबंध कधी आणला नाही म्हणून त्यांचे वेगळेपण उठून दिसते.

- वसंत भोसले

शरद पवार यांच्याशिवाय गेली चाळीस वर्षे महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होत नाही आणि देशपातळीवरदेखील त्यांच्या मताचा अनादर करता येत नाही, एवढे स्थान त्यांनी नक्कीच कमावलं आहे. त्यांच्या राजकारणाची पार्श्वभूमी, त्यांच्याविषयीचे असंख्य गैरसमज आणि त्यांना अनोळखी असलेल्या नव्या पिढीचा रोष आदी गोष्टी बाजूला सारून ‘साहेब, तुमचं चुकलंच!’ असे म्हणावे लागते. कारण त्यांच्यातील गुणांची कदर करणारा वर्ग आज राहिला नाही, एवढेच काय तर त्यांच्या आशीर्वादाने आणि पाठबळाने मोठे झालेले जिल्हा नेतेही त्यांच्याबरोबर राहत नाहीत. ते सोडून पळ काढताहेत. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील हे त्यापैकीच आहेत. ते योगायोगाने नातेवाईकही आहेत. जवळचे नातेवाईकही सोडून जात आहेत, याचा अर्थ काय? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला, तेव्हा ते भडकले. खरे तर तो प्रश्न टोलविता आला असता. मात्र, त्यांची राजकीय भूमिकाच माहीत नसणाऱ्या पत्रकारास कोण सांगणार?

शरद पवार आता एकोणऐंशी वर्षांचे आहेत. येत्या १२ डिसेंबरला त्यांना ऐंशीवे वर्ष लागेल. वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे साठ वर्षांपूर्वी असाच प्रसंग उद्भवला होता, तेव्हा त्यांनी राजकीय भूमिका घेतली आणि येथे नातेवाइकाचा संबंध कोठे येतो? असा सवाल केला होता. त्यामुळे पत्रकारांवर भडकले म्हणजे शरद पवार नैराश्यातून असे वागतात किंवा भडकतात याला म्हणणे गैरलागू आहे. बारामतीचे खासदार आणि सत्यशोधक चळवळीचे थोर नेते केशवराव जेधे यांचे निधन झाले होते. त्यामुळे पोटनिवडणूक लागली होती. काँग्रेसने जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव पवार शेतकरी कामगार पक्षाकडून उभे होते. ९ फेब्रुवारी १९६० रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत युवक काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने शरद पवार यांनी वसंतराव पवार यांचा प्रचार न करता ते गुलाबराव यांच्या प्रचारात आघाडीवर होते. याची परवानगी आई शारदाबाई यांच्याकडून घेतली होती. ते म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू माझे नेते वाटतात. काँग्रेसचा विचार मला पटतो आहे. विद्यार्थी म्हणून पुण्यात राजकीय काम करताना काँग्रेसचे काम करतो. मला त्या विचारानेच काम करू द्या! आईनेही परवानगी दिली. वसंतराव पवार यांचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला. गुलाबराव जेधे निवडून आले. राजकारणात नात्याचा संबंध येतो कोठे? विचारांचा विचार केला पाहिजे, असे म्हणतच त्यांनी बंधूच्या विरोधात काम केले. ही त्यांची प्रचाराची पहिलीच निवडणूक होती आणि गेल्या (२०१९) लोकसभा निवडणुकीत मावळमधून पार्थ पवारांचा पराभव होईपर्यंत पवारांच्या घरातील व्यक्तीचा तो पहिलाच पराभव होता. पार्थ पवार हा पवार घराण्यातील चौथ्या पिढीचा प्रतिनिधी आहे.

माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. ते लढले असते तर चित्र वेगळे निर्माण झाले असते. मात्र, पार्थ पवार यांच्या आग्रहाने मावळमधून उमेदवारी देण्यात आली तेव्हा मावळ, बारामती आणि माढा या तीन मतदारसंघांतून एकाच घरातील नात्याचे उमेदवार नकोत म्हणून त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, अशी प्रचंड राजकीय समज असणारे शरद पवार यांनी राजकारणात नात्याचा, मैत्रीचा संबंध कधी आणला नाही म्हणून त्यांचे वेगळेपण उठून दिसते. आता त्यांचं काय चुकलं? हा सर्व गुण त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये उतरविता आला नाही. त्यांना ट्रोल करणाऱ्या नव्या पिढीला यातील काहीच माहीत नाही. शरद पवार हे प्रागतिक नेते आहेत. त्यांना उद्योगधंद्यात काय चालते, ते कळते, त्यांना कोल्हापूरचा इतिहास लिहिला गेला आहे का? याची माहिती हवी असते. वानखेडे स्टेडियमवरील बांधकामाचे बारकावे माहीत असतात. त्यांना आयटी केंद्र उभे करण्यासाठी काय करावे लागेल, याची जाणीव असते. आपल्या शेतीला अतिपाण्याचा त्रास होतो आहे, ते बाहेर काढण्यासाठी सांगलीतील एका उद्योजकाने केलेल्या प्रयत्नाची माहिती दिल्ली ते मुंबई विमान प्रवासात घ्यायची असते. यासाठी त्या उद्योजकास विमानात बसल्यानंतर मिळणारा निवांत वेळ भेटीचा म्हणून दिला होता. एकदा मुंबईतील क्रिकेट क्लबवर बैठक चालू झाली होती. रात्रीचे पावणे आठ वाजले होते. बसता बसता त्यांनी जांभई दिली, तेव्हा एकाने विचारले, कंटाळलाय! ही तेरावी बैठक आहे आणि सव्वानऊ वाजता शेवटच्या बैठकीला जायचे आहे. ती संपताच दिल्लीला निघायचे आहे. सकाळी कॅबिनेटची बैठक आहे, असे ते सांगत होते.

त्यांच्या रागावण्यावरून परवा एक माहिती सोशल मीडियावर पडली होती. पुण्याजवळ हिंजवडी आयटी पार्कच्या जागेवर सहकारी साखर कारखान्याच्या भूमिपूजनास गेले होते. त्या संयोजकांनाच सांगितले की, मला येथे आयटी पार्क उभे करायचे आहे. त्याला राजीव गांधी यांचे नाव देणार आहे. तुमच्या साखर कारखान्याला जवळच शंभर एकर जमीन उपलब्ध करून देतो. आयटी पार्क झाला, पुण्याचे नशीबच बदलले आणि त्या कार्यकर्त्याचा साखर कारखानाही होऊन ते सहकारमहर्षीही झाले. यात त्यांचे चुकले का? याच आयटी पार्कमधील पोरं-पोरी शरद पवार यांची ट्रोल करीत टिंगल टवाळकी करतात तेव्हा वाटते, तुमचं चुकलंच!

मुंबई शहरावरील बोजा कमी करावा म्हणून सिडकोची स्थापना आणि नवी मुंबई शहराची निर्मिती झाली. माणसांच्या आहारात फळांची गरज आहे. आपण त्याकडे लक्षच दिले नाही म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळबाग योजना अनुदान देऊन लागवड वाढविण्याचा प्रयत्न केला. आज कोणत्याही शहरात, महामार्गावर किंवा तालुक्याच्या गावापासून बºयापैकी मोठे खेडे असलेल्या ठिकाणी प्रवेश करा, रस्त्याच्या कडेला फळे विकणारा माणूस दिसणारच! हीच योजना देशाने स्वीकारली. कोकणचा आंबा, नागपूरची संत्री, कोणत्याही फळाचे नाव घ्या, ही त्यांची देण आहे. परवा परवा त्यांनी तीन दिवसांचा सातारा-सांगली-कोल्हापूरच्या महापुराचा दौरा केला. महापूर असो की भूकंप असो, त्याच्या व्यवस्थापनासाठी काय करावे लागते, याची उत्तम जाण असणारा भारतात दुसरा नेता सापडणार नाही. किल्लारीला पावणेपाच वाजता भूकंप झाला. साडेसहा वाजता मुंबई सोडून एका तासात तेथे पोहोचून सलग ७२ तास काम करणारे शरद पवार! या वयातही चिपळूण जवळचे तिरवे गावाचे धरण फुटले तर त्याला भेट देणारा एकमेव मोठा नेता शरद पवारच! किल्लारीच्या भूकंपानंतर एकेदिवशी कोयना परिसराला धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू वारणा धरणाजवळ होता. ते धरण मातीचे! काहीतरी गडबड होणार असे वाटले. हा धक्का मोठा होता. तातडीने हेलिकॉप्टर काढले आणि धरणाजवळ उतरले. सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक रामराव वाघ ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने तिकडे धावत होते, पण ते पोहोचेपर्यंत मुख्यमंत्री महोदय शरद पवार धरणाची सुरक्षितता ठीक आहे, हे पाहून मुंबईला रवानाही झाले होते. काय तो वेग! झपाटा! तरीही तुमचं चुकलंच!

‘आयसीसी’चे अध्यक्ष पद भूषविणारे एका दिवसात दुबईची बैठक करून रात्री पंतप्रधानांच्या भेटीला राजधानीत पोहोचणार! सलग दहा वर्षे भारताचे कृषिमंत्री राहिले. त्यांच्या धोरणाने महागाई झाली म्हणून ओरडणारे त्यांनीच शेतीमालाचे भाव वाढविल्याशिवाय शेतकरी उत्पादन वाढविणार नाही, त्याची शेती किफायतशीर होणार नाही, हे जाणले. देशाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले असताना अन्नधान्याची आयात करणाºया देशाचे रूपांतर निर्यातदार देशात करून टाकले. भात, मका, फळे, भाजीपाला, गहू, साखर, आदींची मुबलकता वाढली, त्याची निर्यात होऊ लागली. यासाठीच्या धोरणांची एकदा माहिती नव्या पिढीने घेतली पाहिजे. १९९५च्या दरम्यान एन्रॉन प्रकरणावरून बराच गोंधळ त्यांच्या विरोधात करण्यात आला. तेव्हा त्यांनी जाणले होते की, महाराष्ट्रात दरवर्षी वाढणाºया विजेच्या मागणीला गवसणी घालायची असेल तर किमान दहा हजार कोटींची गुंतवणूक दरवर्षी करावी लागेल. राज्य शासन ते करू शकत नव्हते. त्याला पर्याय खासगी भांडवलाला सहभागी करून घेणे, त्यात कंपनी निवडताना चूक झाली, मात्र धोरणात चूक नव्हती. तेच धोरण गुजरातने राबविले. कर्नाटक, आंध्र प्रदेशने राबविले. शरद पवार चुकले हे दाखविण्याची स्पर्धा विरोधकांची चालू होती. पवार बदनाम झाले. मात्र, त्यात महाराष्ट्राचेच नुकसान झाले, याचे भान कोणालाच राहिले नाही. खासगीकरणाचाच त्यांना एवढा ओढा असता तर बारामतीला मेडिकल कॉलेज काढायला कोणा इंद्रदेवाकडे वशिला लावण्याची गरज नव्हती. त्यांनी नेहमीच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला बळ दिले. तेथे नेतृत्व करणे पसंत केले. आषाढी वारीला वारकरी जातो तसे ते दरवर्षी ९ मे रोजी कर्मवीर आण्णांना अभिवादन आणि रयत शिक्षण मंडळाच्या सभेत हजर असतात. ही तारीख चुकत नाही. ते पंढरीला जात नसतील, पण समाजातील पांडुरंगांची सेवा करणाऱ्या कर्मवीरांना ते कधी विसरत नाहीत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस