समीर देशपांडेकोल्हापूर : ‘ सीपीआर’मधील सर्जिकल साहित्याचा पुरवठा करण्याचा ठेका ठराविक ठेकेदारालाच मिळावा, यासाठीच जाणीवपूर्वक सरळ खरेदीची टिप्पणी सादर करण्याचा आल्याचा धक्कादायक निष्कर्ष वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चौकशी समितीने काढला आहे. २ कोटी ८९ लाख २५ हजार रुपयांची ही निविदा होती. अशा पद्धतीने वरिष्ठ डॉक्टर खरेदी समितीमध्ये असताना अशी बेकायदेशीर प्रक्रिया राबवली गेली कशी किंवा या सर्वांवर कोणाचा राजकीय दबाव होता का, याची आता चर्चा सुरू झाली आहे.पहिल्या ४ कोटी ८६ लाख रुपयांच्या सर्जिकल साहित्य खरेदीप्रकरणी ठेकेदार मयूर लिंबेकर याने मुलुंड येथील इएसआयसी रुग्णालयाचे खोटे दरपत्रक जोडून हा ठेका मिळवल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर त्या प्रकरणी ‘हो’, ‘नाही’ करीत चौकशी होऊन त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची चौकशी सुरू असताना हे २ कोटी ८९ लाखांचे प्रकरण पुढे आले आणि ते देखील ‘लोकमत’नेच उघडकीस आणले. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
समितीने काढलेले निष्कर्ष
- खरेदी समितीने इएसआयसी मुलुंड, वरळी या दरकरारावर साहित्य खरेदीचा निर्णय योग्य वाटत नाही.
- या खरेदी प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ लिपिक रमेश खेडेकर यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता हलगर्जीपणा व अनियमतता केल्याचे दिसून येत आहे.
- ठेकेदाराने सादर केलेली खोट्या बनावट दस्तऐवजांची पडताळणी न करता या खरेदी समितीने प्रक्रिया राबविल्याचे दिसून येत आहे.
- ‘सीपीआर’ला ३० जानेवारी २०२५ व वित्तीय अधिकारी १९७८ नुसार खरेदीबाबत मर्यादा असताना संस्थास्तरावर खरेदी करण्यात आलेली दिसून येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीच नाहीजिल्हा नियोजन समितीमधून हा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यावेळी दीपक केसरकर हे पालकमंत्री होते. तर राहुल रेखावार हे जिल्हाधिकारी होते; परंतु ही खरेदी प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच राबविण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्षही चौकशी समितीने काढला आहे.
स्टोअर लिपिक यांना बळीचा बकरा बनवण्याची तयारीहे सर्व प्रकरण पाहता ‘सीपीआर’मधील खरेदीच्या आडून नेमके काेणाचे भले करायचे ठरले होते हे पुढे येण्याची गरज आहे; परंतु कागदोपत्री हे कुठेच उघडकीस येण्याची शक्यता नसल्याने अधिकारी आणि डॉक्टरांना हे प्रकरण शेकवण्याची यारी सुरू आहे. त्यातही सर्जिकल स्टोअर लिपिक रमेश खेडेकर यांना या प्रकरणात बळीचा बकरा बनवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत; परंतु केवळ आपल्या बदलीच्या भीतीने मुकाटपणे नेते सांगतील त्यावर सह्या करणाऱ्या डॉक्टरांनाही यानिमित्ताने दणका बसण्याची गरज आहे.