उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. माळगावकरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू तसेच स्वाईन फ्लू सदृश आजाराने एकाचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुधारला नाही, तर आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असंख्य कामगार काम करतात. ते कुटुंबासह गावात राहतात. सध्या साथीचे आजार पसरले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने वेळोवेळी लोकांची तपासणी करून जनजागृती करावी, ग्रामपंचायतीला लोकांच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्यास भाग पाडावे, श्वानदंशावरील लस उपलब्ध करून द्यावी, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य केंद्रात उपचार मिळावेत, त्यांच्यावर सीपीआरमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेनेच्यावतीने उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, पोपट दांगट, विनय करी, निवास यमगर, वीरेंद्र भोपळे, दिलीप सावंत, पंकज शिंदे, दीपक पाटील, दत्ता पाटील, बाबूराव पाटील, शिवाजी लोहार, बंडा पाटील, बाळासो नलवडे, संदीप दळवी, डॉ. संतोष कांबळे, सुखदेव कुरणे, जनार्दन लांडगे, दिलीप गुरव, संतोष चौगुले, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवसेनेचे ‘बोंब मारो’ आंदोलन
By admin | Updated: August 23, 2014 00:05 IST