कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील अन्न विषबाधा परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित बहुतेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. मात्र, ग्रामस्थ आणि आरोग्य विभागाला अन्न व प्रशासनाने घेतलेल्या अन्नाच्या नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.गावच्या कल्याणताई देवीच्या यात्रेत अन्नातून सुमारे ७०० हून अधिक जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. चार दिवस ४०० हून अधिक आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत होऊन आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला पत्र देऊन साथीचे आजार पसरू नयेत यासाठी गावातील स्वच्छता, तुंबलेल्या गटारी प्रवाहित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतही स्वच्छता मोहीम राबवत आहे. मात्र, विषबाधा कशातून झाली याचा अहवाल अन्न व प्रशासन विभागाकडून अद्याप आला नसल्याने या अहवालाची प्रतीक्षा सर्वांना करावी लागत आहे. दरम्यान, विषबाधा घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादातील खिरीचे व गावाला पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेतले आहे. महाप्रसादामध्ये खिरीबरोबरच अंबील, भात, आमटी याचाही समावेश होता. मात्र, केवळ खिरीचेच नमुने घेतल्याने व विषबाधा कदाचित इतर पदार्थांतून झाले असल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विषबाधा घटनेनंतर गावातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. ग्रामपंचायतीला गावातील स्वच्छता करण्यासाठी पत्र दिले आहे. दक्षता म्हणून गावातील उपकेंद्र २४ तास सेवेसाठी उपलब्ध असून तीन शिफ्टमध्ये १५ कर्मचारी व दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहेत. - डॉ. पांडुरंग खटावकर, शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी.