श्रीकांत शिदेंचं CM शिंदेंसमोर भाषण; पिता-पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू अनावर, पण काय घडलं?

By मुकेश चव्हाण | Published: February 17, 2024 08:53 AM2024-02-17T08:53:22+5:302024-02-17T09:08:41+5:30

धर्मवीर आनंद दिघेंनी वयाच्या १६-१७व्या वर्षी शाखाप्रमुख केलं. शाखाप्रमुख झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी कधी मागे वळून पाहिलं नाही, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले. 

Shiv Sainiks present along with CM Eknath Shinde were emotional after the speech of son MP Shrikant Shinde | श्रीकांत शिदेंचं CM शिंदेंसमोर भाषण; पिता-पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू अनावर, पण काय घडलं?

श्रीकांत शिदेंचं CM शिंदेंसमोर भाषण; पिता-पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू अनावर, पण काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीच्या काळात जी मेहनत घेतली, त्या मेहनतीच्या बळावर आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाच्च शिखरावर जाण्याचं काम त्यांनी करुन दाखवलं, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात श्रीकांत शिंदे बोलत होते. 

कोल्हापूरचा पूर असेल, इर्शाळवाडीची घटना असेल, कोकणातला पूर असेल कोणतीही घटना घडली की सगळ्यात आधी धावून जाणारा कोणी शिवसैनिक असेल तर ते एकनाथ शिंदे हे आहेत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. धर्मवीर आनंद दिघेंनी वयाच्या १६-१७व्या वर्षी शाखाप्रमुख केलं. शाखाप्रमुख झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी कधी मागे वळून पाहिलं नाही, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले. 

जेव्हा कधी मी कार्यक्रमाला जातो तेव्हा मला विचारतात की, वडील एकनाथ शिंदेंसोबतची आठवण सांगा. पण मला ती सांगता येत नाही. कारण मी कायम त्यांना शिवसैनिकांसोबतच पाहिले, आमच्यासोबत कधीही पाहिले नाही. मी म्हणायचो आम्हाला कधी वेळ देणार पण ते देऊ शकले नाहीत, असं म्हणत श्रीकांत शिंदेंना अश्रू अनावर झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातही पाणी आले. 

शिंदे पिता-पुत्रांसह उपस्थित असणारा शिवसैनिकही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, 'शिवसेना' या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो- एकनाथ शिंदे

शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते, असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केलं. 

Web Title: Shiv Sainiks present along with CM Eknath Shinde were emotional after the speech of son MP Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.