कुरुंदवाड : अस्वच्छता हेच रोगराईचे प्रमुख कारण असते. शिरढोण (ता. शिरोळ) येथील आरोग्य उपकेंद्राभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हाय व्होल्टेजच्या विद्युत तारांचे जाळे, तुंबलेले पाणी, अस्वच्छता यांमुळे गावच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या उपकेंद्राचेच आरोग्य धोक्यात आले आहे. दहा हजार लोकवस्ती असलेल्या या गावात माळभागावरील खण भागात जिल्हा परिषदेचे आरोग्य उपकेंद्र आहे. चार खोल्यांची सुसज्ज इमारत, डिलिव्हरी रूप (बाळंतपण विभाग), आरोग्य सेविकांच्या निवासाची सोय आहे. मात्र, या इमारतीभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीवर तसेच सभोवताली काटेरी झुडपे उगवली आहेत. गावच्या खणीतच उपकेंद्र बांधल्याने पावसाळ्यातील पाण्याने खण तुडुंब भरली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे. या परिसरातील काही लोक उघड्यावरच शौचास बसतात, यावर कोणाचेही नियंत्रण नाही.ग्रामस्थांना चोवीस तास आरोग्य सेवा मिळावी यासाठी या इमारतीत आरोग्य सेविकांचे निवासस्थानही आहे. मात्र, घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे आरोग्य सेविकाही निवासी होण्यास तयार नाहीत. या उपकेंद्रालगत विद्युत मंडळाचेही विद्युत उपकेंद्र आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्राभोवती उच्च दाबाच्या विद्युत तारांचे जाळे विणलेले आहे.अस्वच्छता हेच कोणत्याही रोगराईला निमंत्रण ठरू शकते. आपला परिसर स्वच्छ ठेवा व रोगापासून मुक्ती मिळवा, असे भिंतीवरील फलकावरून संदेश देणारे आरोग्य विभाग मात्र या घाणीच्या साम्राज्याचे बळी ठरत आहे. गावच्या आरोग्याची काळजी घेणारे उपकेंद्राकडे आरोग्य विभागाबरोबरच ग्रामपंचायतीचेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ग्रामपंचायतीने किमान उपकेंद्राभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
‘शिरढोण’चे आरोग्य बिघडले
By admin | Updated: October 21, 2014 23:42 IST