कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची मुदत संपल्याने ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक झालेली नाही. तातडीने सदस्यांची नियुक्ती करून बैठक घ्या, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी शेट्टी यांनी मुख्य सचिव कुंटे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यात ते म्हणतात, गतवर्षीचा गळीत हंगाम संपला. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी जवळपास ३०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची एफआरपी थकविली आहे. चालू वर्षीचाही गळीत हंगाम संपत आला असून चालू वर्षीच्या गळीत हंगामातील जवळपास २८०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारकडून थकीत एफआरपीबाबत कारवाई करण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असून, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीच एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी न्याय कुणाकडे मागणार, यासाठी तातडीने ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची नियुक्त करून बैठक बोलाविण्याची मागणी केली.
फोटो : ३००३२०२१-कोल-राजू शेट्टी ०१
फोटो ओळ : माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी मुंबईत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेऊन ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक घेण्याची मागणी केली.