गडहिंग्लज : भूमिपुत्रांना संकटात टाकणाऱ्या शक्तिपीठ महामार्गातून शक्तिपीठांना शक्ती मिळणार नाही. त्यासाठी भक्तांच्या खिशातूनच टोलवसुली होणार आहे. त्यामुळे ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नसून अदानींच्या भल्यासाठीच सुरू आहे. यातून ठेकेदारांना पोसून ५० हजार कोटींवर हात मारण्याचा राज्यकर्त्यांचा घाट आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे येथील संकेश्वर-बांदा महामार्गावर आयोजित रास्ता रोको आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शक्तिपीठ महामार्गात चंदगड मतदारसंघाचा समावेशाची मागणी करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला. रास्ता रोकोप्रकरणी पोलिसांनी शेट्टी, आमदार राजेश पाटील यांच्यासह २२ प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडले.राजेश पाटील म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर ‘चंदगड’च्या विकासासाठी विधायक पावले टाकल्यास पाठिंबा देण्याची ग्वाहीसह आमदारांना शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, पर्यटन रोजगारवाढीच्या नावाखाली त्यांची शक्तिपीठाची मागणी शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवणारी आहे. मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेण्यासाठीच त्यांनी चुकीची मागणी केली आहे. पराभूत मंडळी एकत्र आल्याचा त्यांचा कांगावाही हास्यास्पद आहे.कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तिपीठाच्या नावाखाली धार्मिक भावना गोंजारण्याचा प्रयत्न आहे. मात्र, सरकारच्या भूलथापांना राज्यातील शेतकरी बळी पडणार नाही. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षण व काळ्या आईच्या सन्मानाची लढाई ताकदीने लढवू. ‘चंदगड’च्या मातीला हातदेखील लावू देणार नाही.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, स्वाती कोरी, राजेंद्र गड्यान्नावर, कॉ. सम्राट मोरे, बाळेश नाईक, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, जयसिंग चव्हाण, अमर चव्हाण, नितीन पाटील यांचीही भाषणे झाली. आंदोलनात रामाप्पा करिगार, अंजना रेडेकर, कृष्णा भारतीय, अभयकुमार देसाई, शिवप्रसाद तेली, रियाज शमनजी, रामदास कुराडे, अजित खोत, बाळासाहेब गुरव, शिवाजी होडगे, रामदास कुराडे आदी सहभागी झाले होते.
ठेकेदारांच्या बिलासाठी भांडामुख्यमंत्र्यांना खूश करून काहीतरी मिळवण्यासाठीच त्यांनी शक्तिपीठाची मागणी केली आहे. त्याऐवजी राज्यातील ठेकेदारांच्या थकीत ९० हजार कोटींच्या बिलांसाठी विधानसभेत आंदोलन करावे, असा टोलाही खासदार शेट्टी यांनी आमदार पाटील यांना लगावला.
म्हणूनच पक्षीय बंधने बाजूलायापूर्वी विमानतळ, हेलिकॉप्टर मागितलेल्या शिवाजीरावांनी आता शक्तिपीठाची मागणी केली आहे. त्यामुळे काळ्या आईसह भूमीपुत्रांवर संकट आले आहे. म्हणूनच, पक्षीय बंधने बाजूला ठेवून आपण शक्तिपीठाच्या विरोधात उभे आहोत, असे भाजपाचे संग्राम कुपेकर यांनी स्पष्ट केले.
आता आम्हीच त्यांना आपटणार..!शाळकरी मुलांसाठी गाड्या सोडणार यासह त्यांच्या अनेक घोषणा अजूनही हवेतच आहेत. काहीतरी करतील म्हणून निवडणुकीत आम्हीच उचलून धरले. परंतु, शेतकरीविरोधी शक्तिपीठाची मागणी केल्यामुळे आता आम्हीच त्यांना आपटल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा‘मनसे’ जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला.