लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आणि घरफाळ्याच्या अतिरिक्त दंडाच्या जनतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने तत्काळ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे, यासह घरफाळा दंड रकमेबाबतीतील शासन निर्णयात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना शुक्रवारी केल्या.
महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाकडून कायद्यातील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून नवीन बांधकाम झालेल्या इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता आणि घरफाळा लागू करण्याकरिता अवाजवी दंडाची रक्कम लावली जात असल्याने, घरफाळ्याची आणि बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत, या पार्श्वभूमीवर घरफाळ्याची प्रलंबित प्रकरणे, नगररचना विभागाचे कामकाज आदी विषयी बैठक झाली.
यावेळी बलकवडे यांनी घरफाळ्याच्या तक्रारींसदर्भात नागरिकांसाठी आठवड्यातील दोन दिवस ठरवून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करू. या शिबिराद्वारे नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल. नगररचना विभागाच्या कामकाजात सुधारणा होऊन नागरिकांना नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊ, असे सांगितले.
या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, नंदकुमार मोरे, रविकिरण इंगवले, सुनील जाधव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपआयुक्त निखिल मोरे, उपआयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर, जलअभियंता अजय साळुंखे, घरफाळा अधीक्षक विजय वनकुद्रे, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत आदी महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.
चौकट
वाईकर रुग्णालयावर कारवाई करा
लाखो रुपयांचा घरफाळा बुडवूनही डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या सिद्धांत हॉस्पिटलवर कोणतीही कारवाई होत नाही. सन २०२१ च्या अधिसूचनेप्रमाणे डॉ. वाईकर यांच्या रुग्णालयावर दोन दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
चौकट
पंचनामे पूर्ण, निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, पंचनाम्याची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी पूर्ण केल्यानंतर लवकरच शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून रोज सुमारे २५०० टेस्ट केल्या जातात. त्यातही पॉझिटिव्ह रेट दीड ते दोन टक्के इतका आहे. यासह डेल्टा प्लस रुग्णांची संख्याही आवाक्यात आहे.