कोल्हापूर : करवीरनिवसिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भागवत निरूपण, गायन आणि महासरस्वती विधान यांमुळे मंदिर परिसरातील वातावरणात रविवारी भक्तांचा अलोट सागर उसळला होता. या भक्तिमय वातावरणात सकाळी साडेनऊच्या सुमारास पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मनेजर सिंग यांच्या पथकाने मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रि येस सुरुवात केली. औरंगाबाद येथील पुरातत्त्व खात्याच्या सात तज्ज्ञांच्या पथकाकडून मूर्तीच्या सद्य:स्थितीची छायाचित्रे, मोजमाप, रेखाटने यांच्या नोंदी शनिवारी (दि. २५) घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार रविवारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. रात्री अकरापर्यंत संवर्धन प्रक्रियेचे काम सुरू होते. सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महाडिक यांनी संवर्धन प्रक्रिया व्यवस्थितपणे करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. महाडिक सायंकाळच्या आरतीसही उपस्थित राहिले. श्री अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेवेळी धार्मिक अनुष्ठानातील सहस्रचंडी महाअनुष्ठानाचे पाठवाचन पूर्ण झाले. एकूण ११५ ब्रह्मवृंदांनी तीन दिवसांमध्ये एक हजार पाठांचे पठण केले. महासरस्वती विधानही संपन्न झाले. सुश्रीशा मुनीश्वर आणि श्रीश मुनीश्वर यांनी यजमानपद भूषविले. लाभेश मुनीश्वर यांनी हनुमंतावर शेंदूर सहस्रार्चन केले. सायंकाळच्या सत्रात घोडजकर शास्त्री यांनी ‘देवी भागवत’ कथा निरूपणात देवीच्या भक्तीचा आणि मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे देवी भागवताचे आचरण हे सोदाहरण विशद केले. निरूपणाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. केतकी मुनीश्वर व केदार मुनीश्वर यांनी देवीची सायंकालीन आरती केली. कालांजली परिवाराच्या सदस्यांनी सादर केलेल्या सुश्राव्य गायनाने मंदिर परिसरात भक्तीचा सागर ओसंडून वाहिला. --आजचे कार्यक्रम सहस्रचंडीच्या शंभर पाठांचे हवन देवी भागवत निरूपण दुपारी चार वाजता अजित कुलकर्णी यांचे सतारवादन रात्री आठ वाजता
अंबाबाईच्या मूर्तीवरील संवर्धनाचा दुसरा दिवस
By admin | Updated: July 27, 2015 00:43 IST