कोल्हापूर : शहरातील सहा नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि एक वकील यांच्या घरावर शुक्रवारी आयकर अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्याची कारवाई आज सलग दिवशीही सुरू राहिली. आयकर अधिकाऱ्यांना हवी असलेली माहिती देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचे चार्टर्ड अकौंटंट, वकिलांची मदत घेतली आहे. कागदपत्रांची छाननी करण्याचे काम आणखी दोन-तीन दिवस सुरू राहणार आहे. पुणे, मुंबई येथून आलेल्या आयकर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सहा बांधकाम व्यावसायिक व एक वकील यांच्या निवासस्थाने,कार्यालये,फार्म हाऊस आदी ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून शहरात खळबळ उडवून दिली. एक बांधकाम व्यावसायिक तर नगरसेवक असून त्याने विधानपरिषदेची निवडणूक लढविली होती. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू असलेली ही कारवाई मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती. एकाचवेळी विविध व्यवसायाची कागदपत्रे, बँक खाती, स्थावर मिळकतींची कागदपत्रे ताब्यात घेऊन त्याच्या तपासणीचे काम अधिकाऱ्यांनी सुरू केले.विश्रांती घेऊन अधिकाऱ्यांनी आज, शनिवारी पुन्हा हे काम सुरू झाले. आयकर अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली माहिती देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचे चार्टर्ड अकौटंट, वकील यांचे सहकार्य घेतले आहे. तेच अधिकाऱ्यांना माहिती देत आहेत. छापे टाकलेल्या व्यावसायिकांचा बाहेरच्या कोणाशीही संपर्क होऊ दिला नव्हता,परंतु आज मात्र अधिकाऱ्यांनी काहीशी मोकळीक दिली. त्यामुळे त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होत होता. विशेष म्हणजे निवासस्थानी असणारी सर्व कागदपत्रे त्यांच्या कार्यालयात नेऊन तपासली जात आहेत.
कागदपत्रांची छाननी सुरुच
By admin | Updated: December 21, 2014 00:39 IST