कोल्हापूर : कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवीनंतरचे वर्ग प्रत्यक्षात (ऑफलाईन) सुरू करण्याची तयारी जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांकडून सुरू आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप शासनाकडून निर्णय झालेला नाही. त्यामुळे या वर्गांचे शिक्षण सध्या, तरी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पदवी, पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना शासन आदेशाची प्रतीक्षा लागली आहे.
कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवार (दि. १५ जुलै) पासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाकडून मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू झाली. आतापर्यंत जिल्ह्यातील ९४३ शाळांनी इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. या शाळांनी पालकांची संमतिपत्रे आणि ग्रामपंचायतींकडून वर्ग सुरू करण्याबाबतची मंजुरीपत्र, ठराव घेतले आहेत. उर्वरित १११ शाळांकडून तयारी सुरू आहे. प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आला नसल्याने प्राथमिक शाळांमधील वर्गांमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरू करण्यास सध्या, तरी परवानगी मिळणार नसल्याचे दिसते. याबाबत शासनाकडूनही कोणत्या सूचना या विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये द्वितीय, तृतीय वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू करण्याची महाविद्यालयांची तयारी आहे. त्यांना शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा लागली आहे.
चौकट
परीक्षा अर्ज भरण्यास उरले दोन दिवस
शिवाजी विद्यापीठाकडून सध्या पुनर्परीक्षा सुरू आहे. त्यात सोमवारी बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम. ए.,एम. कॉम., एम. एस्सी., बीबीए., बीसीए. अशा विविध अभ्यासक्रमांसाठी १०२४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. उन्हाळी सत्रात (मार्च-एप्रिल) विद्यापीठ एकूण ७३८ परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. त्यासाठी विनाविलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. १४ जुलै) पर्यंत आहे.