कोल्हापूर : कॉँग्रेस पक्षाशी माजी मंत्री सतेज पाटील यांचे काही देणे-घेणे नाही. दुसऱ्याशी हातमिळवणी करून ते पक्ष संपवायला निघाले आहेत. त्यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड त्रास दिला आहे. ते माझ्याशी ज्या पद्धतीने वागले त्याच पद्धतीने आपण त्यांच्याशी वागलो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यांच्याशी आपले सूत्र जमणार नाही, असा पाढाच आमदार महादेवराव महाडिक यांनी रविवारी समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांच्यासमोर वाचला. विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना सांगून पाडल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांची कॉँग्रेस कमिटीत पत्रकार परिषद झाली. ती झाल्यानंतर आ. महादेवराव महाडिक या ठिकाणी आले. यावेळी बाहेर पडणाऱ्या पत्रकारांना महाडिक आमच्यासोबत असल्याचे सांगण्यासाठी निरोप देण्यात आले. जिल्हाध्यक्षांच्या केबिनमध्ये सर्वजण बसले होते. येथे महाडिकांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडून आपले अनेक दिवसांचे मळभ बाहेर काढले. या अनपेक्षित प्रकाराने माजी मंत्री कदम यांच्यासह उपस्थितांची चांगलीच पंचाईत झाली.महाडिक म्हणाले, गत महापालिका निवडणुकीत पतंगराव कदम यांच्यासमोरच आपण ताराराणी आघाडी विसर्जित केली, कॉँग्रेसबरोबर राहिलो; परंतु आपली व पी. एन. पाटील यांची फसवणूक करण्यात आली. माजी मंत्री सतेज पाटील यांनी एकहाती कारभार घेत सर्वांनाच डावलले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय दिवे लावले? ५०० कोटी रुपयांच्या थेट पाईपलाईनसाठी त्यांना सत्ता हवी आहे; परंतु ती होणार आहे का, हा प्रश्न आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेतील सत्तेचा वापर स्वत:साठीच केला. सत्तेच्या नावाखाली त्यांनी हॉटेलसाठी तीन एकर जागा बळकावली.कॉँग्रेस पक्षाशी सतेज पाटील यांचे काही देणे-घेणे नाही. दुसऱ्यांशी हातमिळवणी करीत ते पक्ष संपवायला निघाले आहेत. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील येथे आहेत म्हणून कार्यकर्त्यांना थोडाफार न्याय तरी मिळतो. नाही तर येथे मोगलाई असून सांगली जिल्ह्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आहे. ‘पी. एन.’ निवडून येणार म्हणूनच त्यांना पाडले.बाजार समितीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी वाईट पद्धतीने राजकारण करीत पी. एन. पाटील यांना फसविले. मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी मला प्रचंड त्रास दिला आहे. ते आपल्याशी ज्या पद्धतीने वागले, त्याच पद्धतीने आपण त्यांच्याशी वागलो. विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना पाडणार म्हणून आपण (पान १ वरून) वर्षभरापूर्वीच कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते; त्यानुसार आपण केले. सर्वांना महाडिकांच्या डोळ्यातील कुसळ दिसतंय; पण सतेज पाटील यांचे मुसळ कोणालाच दिसत नाही. ते कधीही स्वत:ची चूक दाखवीत नाहीत. महाडिक गरिबाचे ओझे वाहील; पण श्रीमंताचे श्वान होणार नाही; त्यामुळे त्यांचे आणि आपले सूत्र जमणार नाही. महापालिका निवडणुकीत पी. एन. पाटील यांच्याकडेच सर्व सूत्रे द्यावीत. पतंगराव कदम यांनी सारवासारव करीत आम्हाला काही तिकिटे देता आली नाहीत, अशी कबुली दिली. यावेळी गट-तट न पाहता त्यात दुरुस्ती करू. मागील वाद पंचगंगेत बुडवून नव्याने निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही त्यांनी सांगितले. यावेळी समन्वय समितीचे सदस्य व माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार जयवंतराव आवळे, सत्यजित देशमुख, प्रकाशराव सातपुते, महापौर वैशाली डकरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विधानसभेला सांगून पाडलेविधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना सांगून पाडल्याचा गौप्यस्फोट महादेवराव महाडिक यांनी केला. सतेज पाटील यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड त्रास दिला. त्यामुळे त्यांच्याच पद्धतीने आपण त्यांच्याशी वागलो.नंतर तुम्ही लक्ष देत नाही!महापालिकेच्या गतनिवडणुकीचा अनुभव पाहता, नंतर तुम्ही वरिष्ठ नेते येथे लक्ष देत नाही. इथे काय सुरू असते ते आमचे आम्हालाच माहीत असते, अशी खंतही महाडिक यांनी पतंगराव कदम यांच्यासमोर व्यक्त केली.
सतेज पाटील यांच्याशी जमणार नाही : महाडिक
By admin | Updated: July 27, 2015 00:46 IST