रमेश पाटील
कसबा बावडा : महापालिका प्रभाग रचनेची सुरुवात जेथून होते तो शुगरमिल प्र. क्र. १ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत या प्रभागावर पालकमंत्री सतेज पाटील गटाचेच वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे पाटील व महाडिक यांच्यातील सहकाराच्या सत्तासंघर्षाची नांदी असणारा राजाराम साखर कारखानाही याच प्रभागात येत असल्याने या प्रभागात वर्चस्ववादासाठी अटातटीची लढाई रंगणार आहे. महाडिक यांची राजकीय सूत्रे या कारखान्यावरून हालत असल्याने शुगरमिल प्र. क्र. १ त्यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. मागील २०१५ च्या निवडणुकीत अनुसूचित जाती (पुरुष ) गटासाठी आरक्षित झालेला हा प्रभाग आता सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाला आहे. उलपे मळा परिसरातील अनेकजण या प्रभागात आपले नशीब आजमवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भावकीचा व नातेसंबंधाचा परिणाम या प्रभागावर अधिक दिसून येतो. सध्याचे पडलेले आरक्षण व परिस्थिती पाहता उलपे भावकीतील दोन गटातच सामना होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील गटाकडून श्रीराम सोसायटीच्या माजी उपसभापती व विद्यमान संचालिका जया विजय उलपे, भारती रमेश उलपे, स्नेहिता प्रदीप उलपे, तर महादेवराव महाडिक गटाकडून राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांच्या सूनबाई प्रज्ञा धीरज उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या पत्नी प्रियंका उलपे, श्रीराम सोसायटीचे माजी संचालक प्रल्हाद उलपे यांच्या पत्नी अनिता उलपे इच्छुक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी, शिवसेनेचेही या प्रभागात उमेदवार असणार आहेत. दरम्यान, महापालिका निवडणूक प्रचारात राजाराम साखर कारखान्याच्या कारभाराचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
चौकट
प्रभागातील सोडविलेले नागरी प्रश्न...
शुगर मिल प्रभागातील बराचसा भाग शेतवडीचा आहे. उलपे मळा, वाडकर मळा, भोसले मळा, शुगर मिल कॉलनी, गोळीबार मैदान, राजाराम कॉलनी आदी लहान-मोठ्या कॉलन्यांसह सुमारे २७ कॉलन्या या प्रभागात आहेत. प्रभागातील ८० टक्के रस्त्यांची व गटारींची कामे पूर्ण आहेत. अनेक कॉलन्यांत पिण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. सध्या अमृत योजनेतून १० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रिन्स शिवाजी शाळा पटांगणात बांधण्याचे काम सुरू आहे. प्रभागातील स्वच्छतागृह चकाचक आहेत. तसेच या स्वच्छतागृहावर पाण्याच्या टाक्याही बसवण्यात आल्या आहेत. प्रभाग एलईडी बल्बने उजळला आहे.
चौकट:
प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न...
या प्रभागात नगरसेवक बुचडे यांना शुगरमिल कॉर्नर ते राजाराम कारखाना हा दीड किमीचा प्रचंड खराब झालेला रस्ता करण्यात अपयश आले. हा रस्ता व्हावा म्हणून अनेक वेळा आंदोलने झाली. पण महापालिका व साखर कारखान्याने हा रस्ता खासगी असल्याचे कारण पुढे करून हात झटकले. या रस्त्याचा प्रश्न मिटला नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. प्रभागात प्रिन्स शिवाजी शाळा येथे व्यायामशाळा बांधली आहे. मात्र या व्यायामशाळेला ते साहित्य पुरवू शकले नाहीत. तसेच याच शाळेत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेची मागणी झाली. मात्र, तीही पूर्ण करता आली नाही. काही कॉलनीतील सांडपाण्याच्या निर्गतीचा प्रश्न प्रलंबित आहे.
कोट
तीन कोटी ७० लाखांची कामे केली....
शुगर मिल या प्रभागातील जवळपास अनेक कॉलन्यांतील रस्ते, गटारी यांची ८० टक्के कामे मी पूर्ण केली आहेत. सांडपाण्याची निर्गतही केली आहे. संपूर्ण परिसर सर्वप्रथम एलईडी बल्बने उजळून टाकला आहे. सध्या १० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम प्रिन्स शिवाजी शाळा येथे सुरू आहे. प्रभागातील रस्त्यांची, गटारींची स्वच्छता कशी नियमित होईल याकडे लक्ष दिले जाते व ते पूर्ण केले जाते. साथीचे आजार पसरू नये म्हणून औषध फवारणी नित्यनेमाने केली जाते. कामावर तीन कोटी ७० लाखांवरून अधिक रुपये खर्च केले आहेत. मी माझ्या प्रभागात केलेल्या कामावर समाधानी आहे.
सुभाष बुचडे नगरसेवक, प्र. क्र. १ शुगरमिल.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : १) सुभाष बुचडे (काँग्रेस) २१४६ (विजयी), २) सदानंद राजवर्धन (ताराराणी ) १०८० ३) रमेश पोवार (शिवसेना ) ८४ ४) जयश्री घाटगे (राष्ट्रवादी ) ४२
फोटो २२ बावडा शुगर मिल रस्ता
कॅप्शन : शुगर मिल कॉर्नर ते राजाराम कारखाना हा दीड किलोमीटरचा लांबीचा खराब झालेला रस्ता वाहनधारकांची डोकेदुखी ठरला आहे.