सरुड : गोकुळ निवडणुकीत नाराज असलेल्या माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर गटाने विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला निवडणूकपूर्वीच पहिला धक्का देत या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सरुड येथे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेअंती सत्यजित पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
गोकुळच्या निवडणुकीत सत्यजित पाटील हे ज्या विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत सहभागी झाले होते त्याच आघाडीत त्यांचे कट्टर विरोधक आमदार विनय कोरे यांनाही आघाडीने सामील करुन घेतल्याने सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यामधून नाराजीचा सूर उमटत होता . यातूनच सत्यजित पाटील यांनी या आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी सत्यजित पाटील यांनी शुक्रवारी सरूड येथे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जनसुराज्य शक्ती पक्षाला विरोधी आघाडीत स्थान दिल्यामुळे सरुडकर गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये विरोधी आघाडी विषयी सतंप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान, ही बैठक सुरू असतानाच सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व आ.पी. एन. पाटील हे माजी आमदार सत्यजित पाटील यांची भेट घेण्यासाठी बैठकस्थळी आले. यावेळी त्यांनीही सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली व कार्यकर्त्यांशी दीर्घकाळ चर्चा करून सत्तारूढ गटाबरोबर येण्याची विनंती केली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना सरुडकर गटाच्या विरोधकांना सत्तारूढ गटात स्थान देणार नसाल तरच आम्ही तुमच्या आघाडीबरोबर येऊ अशी अट घातली. महाडिक व आ. पी. एन. पाटील यांनी कार्यकर्त्यांची ही अट मान्य करत यापुढे सरूडकर गटाच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले . त्यानंतर कार्यकर्त्याच्या साक्षीनेच माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
यावेळी जि.प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील, सभापती विजय खोत, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, पन्हाळा तालुकाप्रमुख बाबासो पाटील, डी. जी. पाटील (कोतोली), ॲड. विजयसिंह पाटील (उत्रे), नामदेवराव पाटील-सावेकर, सुरेश पारळे, माणिक पाटील (सातवे), उत्तम पाटील (माले), किरण पाटील (कोडोली),
आदी उपस्थित होते.