शिरोली/ हेर्ले : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील आदर्श ज्वेलर्स हे दुकान अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरने फोडून दुकानातील पाच तोळे सोने आणि तीन किलो चांदीचे दागिने व रोख अडीच हजार रुपये असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पळविला. तर पानटपरी फोडून १५०० रुपये लांबविले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मौजे वडगाव येथील कुंभार कोपरा या मुख्य बाजारपेठ चौकात सचिन बाबूराव लोहार यांचे आदर्श ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. महादेव चौगले यांचा दुकानगाळा भाड्याने घेऊन तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी हे दुकान चालू केले होते. दुकानाचे मालक सचिन लोहार हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवारी सकाळी सात वाजता गावातील सूरज हजारे हा घरी आला आणि कुंभार कोपरा चौकातील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनंी फोडली आहेत आणि तुमचेही दुकान फोडले आहे, असा निरोप मिळताच ताबडतोब लोहार घटनास्थळी गेले. दुकानाचा कडीकोयंडा गॅसकटरने जाळून चोरांनी दुकानातील लॉकर्स उचकटून दुकानातील सोन्याचे गंठण, अंगठ्या, मणी, टॉप्स, चोख सोने असा पाच तोळे सोने आणि चांदीची जोडवी ७५० नग, पैंजण १५०० ग्रॅम आणि अंगठ्या ४०० ग्रॅम असा सुमारे तीन किलो चांदी आणि रोख रक्कम एक हजार असा सुमारे दोन लाख ७५ हजारांचा ऐवज अज्ञातांनी पळविला. जे. के. कुंभार पान शॉप येथून १५०० रुपये रोख रक्कमही पळवली. अभिजित जनरल स्टोअर्स आणि त्रिमूर्ती मेडिकल्स ही दुकानेही फोडण्याचा प्रयत्न केला. सचिन लोहार यांनी शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक के. पी. यादव करीत आहेत. (वार्ताहर)
सराफी दुकान फोडले
By admin | Updated: February 8, 2015 01:04 IST