कारवार : कारवार पोलिसांनी एका तरुणाला पकडून त्याच्याकडील ४० लाखांची रोकड जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सागर भोसले असून, तो मूळचा सांगलीचा आहे. हा पैसा हवाला प्रकरणाचा असावा, असा पोलिसांचा कयास असून, सागरला न्यायालयात हजर करण्यात आले आहे, असे सर्कल पोलीस निरीक्षक शरणगौडा व्ही. एच. म्हणाले.सागर भोसलेच्या म्हणण्याप्रमाणे त्याने हुबळीमध्ये सोने विकले होते व ते पैसे घेऊन निघाला होता. तो म्हणाला, पोलीस मला चोर समजत आहेत; परंतु चोरांच्या भीतीमुळे मी पैसे असे अंगावर लपवून ठेवले होते. तुझ्याकडे इतके सोने कसे आले, असे विचारता तो म्हणाला, माझा मामा केरळच्या वडगरा येथे राहतो. त्याचे दागिन्यांचे दुकान आहे. तसेच मी ‘आटणीवाल्या’चे काम करतो. लोकांनी विकत दिलेले दागिने, करणावळीत तूट म्हणून आलेले सोने व मामाच्या दुकानातील न खपलेले दागिने आटवून गोळा केलेले सोने घेऊन हुबळीला आलो होतो. ही माझी तिसरी खेप आहे. याअगोदर दोन वेळा मी सोने विकले आहे, असे तो म्हणाला. मागच्या खेपेस आपण १२ लाख रुपये कमरेभोवती गुंडाळून नेले होते. यावेळी रक्कम जास्त असल्याने पायावर बांधले होते. बहुधा कोणी तरी पोलिसांना माहिती दिली असावी, असे सागर म्हणाला. पूर्वी आपण सोलापूरला सोन्याच्या दुकानात कामावर होतो. माझ्या मामाचे नाव लक्ष्मण बाबर असून ते सोन्याची अधिकृत कागदपत्रे घेऊन येणार आहेत, असे सागरने सांगितले.पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकहून सोने आणून कारवारला विकण्यात आले होते. तसाच हा प्रकार असेल, असा संशय पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)पायातील सॉक्समध्ये होते २० लाखसागर भोसले हुबळीहून केरळला जात होता. हुबळीहून रेल्वे पकडण्यासाठी तो भटकळकडे जाणार होता; परंतु भटकळला रेल्वे १२ वाजता पोहोचते, तर बस १२.३० नंतर पोहोचते. म्हणून तो बेत रद्द करून कारवारला आला होता. बस स्टॅण्डवरून रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी तो रिक्षात बसला असता, पोलिसांनी त्याला पकडले. दोन्ही पायांना फुटबॉल खेळाडू घालतात, तसे जाड व घट्ट बसणारे सॉक्स घालून त्यात ५०० रुपयांच्या नोटा लपवून ठेवल्या होत्या. प्रत्येक पायावर १० लाख असे २० लाख होते व कंबरेला कापडी पट्टा होता. त्यात एक हजाराच्या नोटा व २० लाख होते. एकंदर त्याच्याजवळ ४० लाख रुपये सापडले, असे पोलीस निरीक्षक शरणगौडा यांनी सांगितले.
सांगलीच्या तरुणाला अटक; ४० लाखांची रोकड जप्त
By admin | Updated: August 14, 2014 00:02 IST