आयुब मुल्लाखोची : प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या आई - वडिलांच्या अपेक्षा दहावीत ९६.२० टक्के गुण मिळवून लाटवडे येथील समीक्षा दीपक कोळी हिने पूर्ण केल्या. कष्टकरी कुटुंबात या उज्वल यशाने आनंदी आनंद निर्माण झाला आहे.उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. पण, कष्टाचा वारसा आहे. गृहिणी असलेली बारावी शिकलेली तिची आई हीच तिची मार्गदर्शिका ठरली आहे. वडील आठवी पास असून, ते एमआयडीसीमध्ये मजुरी करतात. त्यांचा मुलीच्या गुणवत्तेवर अफाट विश्वास होता. मुलगी दहावीला पहिली येणार, चांगले मार्क मिळविणार, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तो मुलीने सार्थ करून दाखविला आहे.वडगाव हायस्कूलमध्ये तिचा प्रथम क्रमांक आला आहे. प्राथमिक शिक्षणापासून ती गुणवत्तेत क्रमांक एकवर राहिली. दहावीचा अभ्यास करताना तिने वैयक्तिक नोट्स काढून तिच्यावर जोर दिला. दररोजचा अभ्यास दररोज पूर्ण करून अभ्यासाचे वर्षभर परफेक्ट नियोजन केले. घरची रचना अगदी साधी आहे. त्यातच नवीन घराचे बांधकाम काढल्याने तिला अभ्यासात अडचणी येत होत्या. घराच्या मागील झाडाखाली बसून तिने आपल्या अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. घरी दुधाळ म्हशी आहेत. आईला - वडिलांना घरकामात तसेच शेती व अन्य कामात ती मदत करते. परीक्षेच्या अगोदर तिने बारा बारा तास अभ्यास केला.
Kolhapur: मजुराच्या मुलीने मिळवले दहावीत ९६.२० टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:25 IST