Sale of 66 applications for Saraf Sangh elections: 23 polling | सराफ संघाच्या निवडणुकीसाठी ६६ अर्जांची विक्री: २३ ला मतदान
सराफ संघाच्या निवडणुकीसाठी ६६ अर्जांची विक्री: २३ ला मतदान

ठळक मुद्देसराफ संघाच्या निवडणुकीसाठी ६६ अर्जांची विक्री: २३ ला मतदान अध्यक्ष, उपाध्यक्षासह १२ संचालकांची होणार निवड

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सराफ व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक २३ तारखेला होणार आहे; यासाठी उमेदवारी अर्ज विक्रीचा बुधवारी अखेरचा दिवस होता. याअंतर्गत एकूण ६६ अर्जांची विक्री झाली आहे. यात अध्यक्षपदासाठी पाच, उपाध्यक्ष पदासाठी तीन, तर संचालक पदासाठीच्या ५८ अर्जांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक समितीप्रमुख कांतिलाल ओसवाल यांनी दिली.

सराफ संघाची निवडणूक दर दोन वर्षांनी होते. संघाच्या अध्यक्षपदी एकदा गुजराथी, तर एकदा मराठी सदस्याची वर्णी लागते. सध्या भरत ओसवाल हे संघाचे अध्यक्ष आहेत. पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १२ संचालकांच्या नव्या कार्यकारिणीसाठी रविवारी (दि. २३) मतदान होणार आहे; यासाठी उमेदवारी अर्ज विक्रीस सोमवारपासून सुरुवात झाली.

बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६६ अर्जांची विक्री झाली. हे अर्ज उद्या, शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत स्वीकारले जातील. अर्ज छाननी व वैध उमेदवारांची यादी शनिवारी (दि. १५) प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज १८ तारखेला मागे घेता येईल, याच दिवशी सायंकाळी सात वाजता उमेदवारांची अंतिम यादी नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.

मतदान २३ तारखेला सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता मतमोजणी होईल. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी कुलदीप गायकवाड, विजय हावळ, रवींद्र खेडेकर, सुहास जाधव व विजयकुमार भोसले, उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र राठोड, किरण गांधी, राजेश राठोड, तर संचालक पदासाठी धर्मपाल जिरगे, अनिल पोतदार, शिवाजी पाटील, संजय चोडणकर, शीतल पोतदार यांच्यासह ५८ उमेदवारांनी अर्ज नेले आहेत.
 

 


Web Title: Sale of 66 applications for Saraf Sangh elections: 23 polling
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.