कोल्हापूर : राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लू डोके वर काढत असल्याबाबच्या अफवा पसरत असल्याने पोल्ट्रीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे. यापूर्वीचा अनुभव खूप वाईट असल्याने पोल्ट्रीधारक अक्षरश: उद्ध्वस्त झाले होते. आता नव्याने संकट येईल की काय? या भीतीने जिल्ह्यातील १४०० पोल्ट्रीधारक हवालदिल झाले आहेत. मात्र, पक्षीपुरवठा करणाऱ्या कंपन्याच अफवा पसरवत असल्याचे पोल्ट्रीधारकांचे म्हणणे आहे.ग्रामीण भागात दूध व्यवसायाला पूरक कुक्कुटपालन व्यवसाय पुढे आला. खेडोपोडी पोल्ट्री व्यवसायाने पाय पसरल्याचे पाहावयास मिळते. वित्तीय संस्थांचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला, त्यातून चार पैसे मिळूही लागले, पण मध्यंतरी बर्ड फ्लूने पोल्ट्रीचालकांना उद्ध्वस्त केले. आताही बर्ड फ्लूचे संकट महाराष्ट्रात येणार असे बोलले जात आहे. त्यामुळे पोल्ट्रीचालक पुन्हा हवालदिल झाले आहेत.
पोल्ट्रीचालक स्वयंपूर्ण म्हणून कंपन्या अस्वस्थपोल्ट्री व्यवसायात मोठमोठ्या कंपन्या उतरल्या आहेत. पोल्ट्रीचालकाला पिल्ली व खाद्य द्यायची आणि मोठी झाल्यानंतर संगोपनाचे पैसे देऊन कंपन्या पक्षी उचलत होते. यामध्ये कंपन्यांचाच अधिक फायदा व्हायचा, त्यामुळे पोल्ट्रीचालक स्वत:च पिल्ले खरेदी करून स्वत: विक्री करू लागल्याने बड्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत.
अफवामुळे शेतकरी उद्ध्वस्तकंपन्यांचा माल पोल्ट्रीत नसेल त्यावेळी त्यांच्याकडून अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे बाजारात पक्ष्यांचा दर घसरतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते.
दृष्टिक्षेपात पोल्ट्री व्यवसाय
- ब्रॉयलर पोल्ट्रीचालक - १४००
- गावरान कुक्कुटपालन - १२०
- पक्ष्यांची संख्या - ३१ लाख
कोल्हापूर जिल्ह्यात कोठेही बर्ड फ्लूसारखी लक्षणे पोल्ट्रीमध्ये दिसत नाहीत. ही केवळ अफवा असून पोल्ट्रीधारकांनी घाबरून जाऊ नये. - डॉ. एम. ए. शेजाळ (पशुधनविकास अधिकारी, पशुसंवर्धन विभाग)शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले की बड्या कंपन्या अफवा पसरवण्याचे काम करतात. आठवडाभर थांबा, ही अफवा हवेतच विरते. बर्ड फ्लू वगैरे काहीच नाही. - राजेंद्र ढेरे (पोल्ट्रीचालक, शिरगाव राधानगरी)